मुंबई – शासनाच्या विविध १४ विभागांतील रिक्त पदांची माहिती १५ डिसेंबरपर्यंत शासनाकडे सादर केलीच पाहिजे, अशी सक्त ताकीद सरकारकडून देण्यात आली आहे. याचा अभ्यास करून जानेवारी २०२३ मध्ये राज्यातील ७५ सहस्र शासकीय पदांच्या भरतीची विज्ञापने प्रसारित करण्यात येणार आहेत. २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या विविध विभागांतील रिक्त असलेली ७५ सहस्र पदे भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाच्या १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. ज्या विभागांचे आकृतीबंध अंतिम झाले आहेत, त्या ठिकाणी सरळसेवा कोट्यातील १०० टक्के, तर आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, त्या विभागांतील सरळसेवा कोट्यातील ८० टक्के पदे भरण्याचा आदेश सरकारने यापूर्वीच दिला आहे.