हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !

‘आपण आपल्या जीवनात कुठलीही गोष्ट जशीच्या तशी स्वीकारत नाही किंवा स्वीकारू शकत नाही. शेतातून किंवा बाजारातून धान्य घरी आणले आणि त्याचा एखादा खाद्यपदार्थ करायचा झाला, तर तो चाळणे, निवडणे, स्वच्छ करणे, वाळवणे, सुकवणे, धुणे, शिजवणे अन् तो विशिष्ट प्रकारे खाणे इत्यादी अनेक संस्कार त्यावर केले, तरच त्यातून पूर्ण समाधान मिळते. ‘संस्कार’ म्हणजे सुखाने उपभोग घेण्यासाठी केलेली सिद्धता ! तुळशीविवाहानंतर विवाहसोहळ्यांना प्रारंभ होतो. येथे विवाह संस्काराविषयी माहिती दिली आहे.

प्रतिकात्मक चित्र

१. विवाह संस्कार आणि त्याचा उद्देश

हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ म्हणजे व्यवहार, ध्येयनिष्ठा, सामाजिक विचार, काव्यात्मकता, वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उन्नयन अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाप आहे. वेदांमध्ये विवाहाचा मुख्य उद्देश प्रजोत्पादन आणि विशेष करून पुत्रोत्पादन हा सांगितला आहे. ऋग्वेदाच्या विवाह सूक्तात वधूला पुत्रोत्पादनासाठी सर्वाधिक आशीर्वाद दिले आहेत. पुत्राच्या जन्माच्या समवेत ‘गृहस्थाश्रम चालवणे’ हाही विवाहामागचा हेतू आहे.

२. धर्मनियंत्रित काम आणि गृहस्थाश्रम यांसाठी आवश्यक असलेला विवाह संस्कार !

स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामेच्छा असते अन् धर्मनियंत्रित काम म्हणजे ‘विवाह संस्कार’ होय. विवाह संस्कारामुळे श्रेष्ठ असा गृहस्थाश्रम प्राप्त होतो. हिंदु धर्मातील अन्य ३ आश्रम हे गृहस्थाश्रमावर आधारित आहेत. गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी आपल्याकडे विवाहाची पद्धत सांगितली आहे आणि ती अत्यंत उत्कृष्ट आहे. देव, अग्नि आणि विद्वान ब्राह्मण यांच्या साक्षीने त्या दोघांनी विवाहबद्ध व्हायचे असते.

३. हुंड्याची चुकीची पद्धत

अलीकडे हुंड्याची पद्धत बंद झाली असली, तरी ‘मुलीच्या पालकांना लग्न (थाटामाटात) करून द्या आणि जमेल तितके सोने द्या’, असे वराकडचे लोक म्हणतात. ही पद्धत बंद केली पाहिजे. वधू स्वतः पायावर उभी असली, तरी त्यांचे पालक म्हणावे तितके धीट झाले नाहीत.

४. विवाह संस्कार करतांना घ्यावयाची दक्षता !

अ. प्रथम ‘वराचे कुळ कसे आहे ?’, हे पहावे. कन्या दिल्यानंतर त्याच्या कुळाची माहिती घेऊ नये.

आ. बुद्धीमान पुरुषाला कन्या द्यावी. वधूही बुद्धीमान, रूपवान, शीलवान आणि निरोगी असावी.

इ. वरापेक्षा वधू वयाने लहान असावी.

ई. वधू जवळच्या नात्यातील नसावी. जवळच्या नातेसंबंधात म्हणजे मामे, आते आणि मावस या भावंडांमध्ये किंवा सगोत्र विवाह करू नये. स्वजातियांमध्ये विवाह करावा.

उ. पत्रिका पाहून विवाह करावा.

५. विवाहाच्या ८ प्रकारांपैकी अधिक चांगला असलेला ‘ब्राह्म विवाह’ ! 

विवाहाचे ८ प्रकार सांगितले आहेत. त्यांतील पहिला प्रकार, म्हणजे ‘ब्राह्म विवाह’ ! हा संस्कारदृष्ट्या अधिक चांगला. ‘उभय वधू-वर आणि कुटुंबीय यांनी वधू अन् वर यांची निवड करून वधू पक्षाने लग्न लावून देणे’, यास ‘ब्राह्म विवाह’ असे म्हणतात. आपल्याकडे बहुतेक विवाह या प्रकारेच होतात.

५ अ. सत्त्वगुण सुखकारक असल्यामुळे अग्नि, देव आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने विवाह केल्यास तो सुखदायक होणे : या विवाहात अनेक प्रकारचे विधी आणि प्रत्येक विधीचे वेगवेगळे मंत्र आहेत, उदा. सीमान्तपूजन, मधुपर्कपूजन, गौरीहरपूजन इत्यादी. विवाहाच्या मंत्रांचा अर्थ नीट समजून घेतला, तर ‘या प्रकारानेच विवाह व्हावा’, असे प्रत्येक तरुणीला वाटेल. ‘नोंदणी पद्धती’ने (रजिस्टर) विवाह न करण्याकडे मुले वळतील. ‘नोंदणी पद्धती’ने विवाह केल्याने कदाचित् पैसे वाचतील, वेळही वाचेल; पण तेथे सत्त्वगुण नसल्याने सुखाची शाश्वती देता येणार नाही. वेदमंत्रांमध्ये सत्त्वगुण प्रकर्षाने असतो. सत्त्वगुण सुखदायक असल्याने संस्कार करतांना वातावरणही सात्त्विक आणि आनंददायक असते. अग्नि, देव आणि ब्राह्मण किंवा ज्ञानी लोक हे सत्त्वगुणी असतात; म्हणून विवाह या तिघांच्या साक्षीने करावा.

६. विवाह संस्कारातील विधी

प्रतिकात्मक चित्र

६ अ. गौरीहर पूजन : या विवाहसंस्कारात ज्या पद्धती सांगितल्या आहेत, त्यामध्ये गौरीहर पूजन सांगितले आहे. त्यात वधूने शंकर-पार्वती यांची पूजा करावयाची असते (वधूने महालक्ष्मी आणि इंद्राणी यांचीही पूजा करायची असते) आणि ‘देवेन्द्राणि नमस्तुभ्यम् ।’ म्हणजे ‘हे देवी इंद्राणी, तुला नमस्कार असो’, हा मंत्रजप करत सौभाग्यप्राप्तीसाठी प्रार्थना करायची असते. त्या वेळी वधूला जोडवी घालतात. वधूला जोडवी घालण्याचे कारण शास्त्रीय आहे. पायामधील ज्या बोटात जोडवे घातले जाते, त्या बोटावर जोडव्याचा दाब पडल्याने त्याचा स्त्रियांच्या विकारावर उपयोग होतो.

६ आ. कन्यादान : हा महत्त्वाचा विधी आहे. कन्यादान विधीत ‘मागील १२ पिढ्या आणि पुढील १२ पिढ्या पवित्र व्हाव्यात’, असा संकल्प आहे. ‘नारायणस्वरूप अशा वराला मी लक्ष्मीस्वरूप अशी माझी कन्या देत आहे’, अशी उदात्त भावना या विधीमध्ये आहे, तसेच ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांच्या प्राप्तीकरता ही कन्या देत आहे’, असे वराला सांगितले जाते. वराने ओंजळीतून पाणी सोडतांना ‘कन्या तारयतु, पुण्यं वर्धताम् ।

म्हणजे ‘कन्या मला तारून नेवो, माझे पुण्य वाढो’ इत्यादी मंत्र वधूपिता म्हणतो.

कन्या माझे तारण करो, पुण्यवर्धन करो, आमच्यात एकी राहो, संकटे येऊ नयेत, शांती आणि पुष्टी रहावी, जे जे चांगले, ते ते आमच्याकडे राहो अन् जे पाप असेल, ते नष्ट होवो. पुण्यकारक गोष्टींचा उच्चार आमच्या हातून होवो. ‘लक्ष्मीस्वरूप’ अशी ही कन्या विष्णुरूपी तुला प्रजोत्पादनासाठी अर्पण करतो’, असा या मंत्राचा अर्थ आहे.

६ इ. मंगळसूत्रबंधन 

माङ्गल्यं तन्तुनानेन मम जीवनहेतुना ।

कण्ठे बध्नामि सुभगे त्वं जीव शरदां शतम् ।।

अर्थ : हे पतीव्रते, पतीच्या जीवनास कारक असे हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो. तू माझ्या समवेत १०० वर्षे जीवन व्यतीत कर.

६ इ १. मंगळसूत्र घालतेवेळी लक्ष्मी, पार्वती आणि शचि यांचे पूजन करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची असणे : मंगळसूत्र घालतेवेळी लक्ष्मी-पार्वती-शचि यांचे पूजन करावयास सांगितले आहे; कारण त्या अखंड सौभाग्यवती आहेत. ‘आपण अखंड सौभाग्यवती असावे’, असे प्रत्येक भारतीय स्त्रीला वाटते; म्हणून या तिघींजवळ ‘अखंड सौभाग्य लाभावे’, अशी प्रार्थना करायची असते. मंगळसूत्र असल्यावर स्त्रीचे रक्षण होते. ‘मंगळसूत्र म्हणजे एक बंधन आहे !

६ इ २. मंगळसूत्र घालण्याचा उद्देश : मंगळसूत्रात उभय पक्षांकडून प्रत्येकी एकेक वाटी आणि दोन मणी देतात. त्या व्यतिरिक्त वर पक्षाकडून मुहूर्तमणी काळ्या मण्यात ओवून देतात. निसर्गतः स्त्री जलतत्त्वाची आणि पुरुष अग्नितत्त्वाचा असतो. त्यामुळे स्त्रीला अग्नितत्त्वाची आवश्यकता असते. कंठात घातलेले मंगळसूत्र म्हणजे आजच्या भाषेत ‘बॅटरीचा सेल’ ! कंठप्रदेशात प्राणवायूचा निवास असतो. सुवर्णाने आयुष्य, तेज आणि कांती वाढते. ते विजय मिळवून देते. सुवर्ण धारण करणार्‍याला वृद्धत्व येत नाही. ते स्थैर्य देते. त्यामुळे सुवर्ण धारण करणे आवश्यक असते. पुरुषांपेक्षा स्त्रियांची शारीरिक झीज अधिक होत असल्यामुळे त्यांना सुवर्णाची आवश्यकता असते.

६ ई. विवाह होम : यानंतर विवाहहोम करायचा असतो. हा होम देव, अग्नि आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने करायचा असतो.

६ ई १. पाणिग्रहण : या विधीमध्ये वधूचे पाणिग्रहण करतांना बसलेल्या वधूसमोर वराने उभे राहून तिचा उजवा हात स्वतःच्या हातात घेऊन ‘पती म्हणून माझा स्वीकार करावा’, असे म्हणायचे असते. असा मान स्त्रीला दिला आहे.

‘विवाहामध्ये पाणिग्रहण हा महत्त्वाचा विधी असल्याने ‘वराने वधूचा हात हातात घेणे’ या विधीसाठी मुहूर्त असतो’, असे कै. धुंडिराजशास्त्री दाते यांनी पुण्यामध्ये एका व्याख्यानात सांगितले होते.

६ ई २. लाजाहोम : पाणिग्रहणानंतर ‘लाजाहोम’ म्हणजे लाह्यांचा होम करायचा असतो. लाह्या हे समृद्धीचे प्रतीक आहे. संसारात समृद्धी असली पाहिजे; म्हणून ‘लाजाहोम’ करायचा असतो.

यज्ञात दिलेल्या तूप-भाताच्या आहुतीमुळे या द्रव्यांचे वायूत रूपांतर होते. हा धूर थेट आपल्या मेंदूत जाऊन बुद्धी सतेज करतो आणि वातावरणही शुद्ध करतो. ‘हे आरोग्यदायी व्रत आम्ही पुढे चालवू’, अशी ग्वाही या विधीतून वधू-वर देतात.

६ उ. सप्तपदी : ‘ही सात पावले कशासाठी चालायची आहेत ?’, हे यामध्ये सांगितले आहे. त्यांचा क्रम येथे दिला आहे.

१. पहिले पाऊल : अन्नाची समृद्धी

२. दुसरे पाऊल : बल आणि तेज

३. तिसरे पाऊल : धनवृद्धी

४. चौथे पाऊल : परिवाराचे सुख

५. पाचवे पाऊल : पशू आणि गृहसामग्री

६. सहावे पाऊल : द्रव्यरक्षण आणि ६ ऋतू सुखदायक होण्यासाठी

७. सातवे पाऊल : ‘तू माझा सखा आणि मी तुझी सखी’ यासाठी असा हा सप्तपदीचा विधी आहे.

वैदिक विधीमध्ये विवाहहोम, पाणिग्रहण, लाजाहोम, अग्निप्रदक्षिणा, अरमारोहण, सप्तपदी, ध्रुव, अरुंधती आणि सप्तर्षी यांचे दर्शन असे ७ विधी येतात. या व्यतिरिक्त धर्मग्रंथात नसलेल्या विवाहपद्धतीत रूढ झालेल्या अनेक अनावश्यक असलेल्या पद्धती बंदच व्हायला पाहिजेत.

६ ऊ. गर्भाधान विधी : विवाहानंतर ‘गर्भाधान’ हा संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. क्षेत्र आणि बीज शुद्ध असेल, तर संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ‘शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।’ अशी प्रजा निर्माण होते. त्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. आद्य शंकराचार्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक अशा रत्नांना आपल्या पोटी जन्म द्यायचा असेल, तर त्यासाठी संस्कार करणे नितांत आवश्यक आहे.

७. विवाह संस्कारामुळे होणारे लाभ

७ अ. स्त्रियांचे शीलरक्षण होण्यासह ‘एड्स’सारखा महाभयंकर रोग न होण्यासाठी ‘विवाह संस्कार’ हा उत्तम उपाय असणे : ‘विवाह’ संस्काराचा मोठ्या प्रमाणांत प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. ‘एड्स या महाभयंकर रोगावर ‘पातिव्रत्य आणि एकपत्नी व्रत’ हाच खरा उपाय आहे’, असे आता आधुनिक वैद्य अन् अगदी पाश्चात्त्यही कंठरवाने सांगत आहेत. ‘विवाह संस्काराने ते सहज साध्य होते’, हे महत्त्वाचे आहे. पातिव्रत्य म्हणजे दास्य नसून शीलरक्षण आहे. शालिनतेने वागणार्‍या स्त्रियांवर कधी अत्याचार होत नाहीत. हिंदु विवाहसंस्कार हा सर्वांच्याच हिताचा असून तो अतिशय चांगला आणि पवित्र आहे.

७ आ. विवाहसंस्कारामुळे इंद्रियनिग्रह, देहाची शुद्धी आणि देवतांचा अनुग्रह इत्यादी गोष्टी सहजसाध्य होणे : हे सर्व संस्कार यथाविधी केल्याने देवतांचा अनुग्रह होतो. जन्मापासून देहाची शुद्धी आणि चित्ताची शुद्धी होते. इंद्रियनिग्रह होऊन सदाचरणाची सवय लागते. ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होते.’

(टीप कै. धुंडिराज दाते यांनी पुण्यात येऊन सलग ४ – ५ व्याख्याने दिली होती. त्यांच्या भाषणाचा काही भाग वर दिला आहे.)

– सौ. मृणालिनी ठकार (ज्यो. भास्कर), (संदर्भ : आनंदी ज्योतिष, दिवाळी विशेषांक २०१७)