आसाममधील राष्ट्रपुरुष आणि योद्धे लचित बरफुकन यांची २ दिवसांपूर्वी ४०० वी जयंती साजरी झाली. त्यांच्या जयंतीच्या निमित्त आसाममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. या वेळी अमित शहा यांनी लचित बरफुकन यांच्या शौर्याविषयी उपस्थितांना अवगत केले. लचित बरफुकन यांच्या अधिपत्याखालील आसाममधील तत्कालीन अहोम साम्राज्याने जुलमी आणि अत्याचारी औरंगजेब, अकबर यांच्याविरुद्ध मोठा लढा दिला होता. त्यामुळे मोगलांना आसामकडे नंतर ढुंकूनही पहाता आले नाही. लचित बरफुकन यांना ‘पूर्वाेत्तरेकडील शिवाजी’, असे म्हटले जाते. त्यांच्या या शौर्याविषयी भारतात किती जणांना ठाऊक असेल ? तर त्याचे उत्तर ‘बहुतेकांना ठाऊक नाही’, असेच असेल.
खोटा इतिहास !
‘संपूर्ण भारतावर ९०० वर्षे मोगलांचे राज्य होते’, असा खोटा इतिहासच आतापर्यंत भारतियांना शिकवला गेला. ‘मोगल हेच भारताचे सर्वेसर्वा होते’, असे एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकांमधून विद्यार्थी मनावर बिंबवले गेले. महाराष्ट्र आणि अन्य काही राज्ये येथील राज्यस्तरीय इतिहासाच्या पुस्तकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडा तरी इतिहास कळतो. अन्य राज्यांमध्ये, तसेच जेथे केंद्रीय शाळांचा अभ्यासक्रम राबवला जातो, तेथील मुले गौरवशाली भारतीय इतिहासापासून वंचित राहिली आणि त्यांच्या मनावर भारतीय राजे नव्हे, तर ‘भारताबाहेरून आलेले मोगल हेच चांगले’, असा इतिहास बिंबवला गेला. स्वातंत्र्यानंतर अशा ६-७ पिढ्यांनी साम्यवादी आणि भारतद्वेषी यांनी लिहिलेला अयोग्य इतिहास घोकून घेतला अन् राष्ट्राभिमान वाढण्यापासून ते वंचित राहिले.
लचित बरफुकन यांचे शौर्य
नौदलाचे महत्त्व ओळखून लचित बरफुकन यांनी नौदल सेना उभारली होती. औरंगजेबाच्या विशाल सेनेला त्यांनी धूळ चारली होती. आसाममध्ये शक्तीशाली ‘अहोम’ साम्राज्य १२ ते १८ वे शतक म्हणजे ६०० वर्षांचा प्रदीर्घ काळ कार्यरत होते. अहोम साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी हिंदु संस्कृती अनुसरली होती; मात्र याचा इतिहासात उल्लेख नाही. अमित शहा यांनी कार्यक्रमात सांगितले, ‘‘इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आहे. आता नवीन इतिहास येणार आहे. या वेळी इतिहासकारांनी ३० साम्राज्ये निवडून त्यांच्यावर लिहावे, नवीन इतिहास, खरा इतिहास सांगण्याची वेळ आता आली आहे. लचित बरफुकन यांच्या शौर्याविषयी हिंदीत लिहून सर्व देशाला माहिती देण्यात येईल. इतिहासाला पुन्हा जिवंत करण्यात येईल.’’
आसामला राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी अभिमान असलेले हिंमत बिस्व सरमा हे मुख्यमंत्री म्हणून लाभले आहेत. त्यांनी अवैध मदरसे बंद करणे, तोडणे, मदरशांचे रूपांतर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये यांमध्ये करणे असे प्रयोग निर्भयतेने केले आहेत. त्यांनी आसामचा साम्यवाद्यांमुळे झाकोळलेला गौरवशाली इतिहास पुन्हा समाजाला अवगत करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून हरवलेल्या लचित बरफुकन यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आसामामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांतून त्यांनी लचित बरफुकन यांचा पराक्रम, देशभक्ती यांवर प्रकाश टाकून आसामी जनतेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात असे कितीतरी बरफुकन होऊन गेले असतील, ज्यांविषयी लोकांना ज्ञात नाही. हे लक्षात घेऊन त्यांचा इतिहास लोकांसमोर आणण्याचे दायित्व सरकार आणि हिंदु जनता यांना पार पाडावे लागणार आहे.
पराक्रमी साम्राज्ये
भारताचा इतिहास शूर, वीर, पराक्रमी, रथी, महारथी आणि चक्रवर्ती राजे, सम्राट यांचा आहे. ही साम्राज्ये काही थोडीथोडकी वर्षे नव्हे, तर काही शतके पूर्वीच्या विशालकाय आणि दूरदूरपर्यंत पसरलेल्या भारतभूमीवर राज्य करून येथील सभ्यता, संस्कृती, आचार, विचार टिकवण्यात यशस्वी ठरली आहेत. परिणामी शतकानुशतके भारतच नव्हे, तर अवघे जग त्या संस्कृतीच्या आधारावर, शक्तीवर टिकून राहिले आहे. चोल राजांवर आधारित चित्रपट अलीकडेच प्रसारित झाला होता. ८ ते १२ व्या शतकापर्यंत चोल राजांचा दक्षिण भारतात दबदबा राहिला. आज दक्षिण भारतात जी काही भव्य-दिव्य, प्रसिद्ध आणि विशाल हिंदु मंदिरे दिसतात, ती या चोल राजांच्या काळातच बांधली गेली आहेत; मात्र याविषयी पुष्कळ अल्प जणांना ज्ञात आहे. चोल राजाचे नाव चित्रपटाच्या माध्यमातून सध्याच्या पिढीला माहिती झाले. यासह मौर्य वंश, गुप्त राजघराणे, चालुक्य असे अनेक पराक्रमी राजवंश भारतात उदयास आले. चित्रपट निर्माते, कादंबरीकार, मालिका निर्माते यांना त्यांच्या कलाकृती निर्माण करायच्याच असतील, तर त्यांनी या राजवंशांची निवड केल्यास लोकांना इतिहासही कळेल आणि त्यांनाही लाभ होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित मालिका, चित्रपट, नाटके यांमुळे छत्रपतींचा इतिहास घराघरांमध्ये पुन:पुन्हा जात आहे, हे एक चांगले लक्षण आहे. त्यामुळे का होईना, शासनकर्त्यांना पुस्तकांमध्ये पालट करणेही भाग आहे. इतिहासातील काही प्रसंगांविषयी वाद अथवा मतभेद असले, तरी उर्वरित इतिहासामुळे लोकांना निश्चित दिशा मिळत आहे. साम्यवादी इतिहासकारांनी त्यांच्या पूर्वग्रहदूषित आणि हिंदुद्वेषी मानसिकतेच्या चष्म्यातून भारतीय इतिहासाकडे पाहिल्याने त्यांना येथील पराक्रमी राजे दिसलेच नाहीत किंवा त्यांना मोगल ‘प्यारे’ वाटले. आता केंद्र आणि राज्य शासनांनी खोट्या कल्पनाकथा मिटवून दैदीप्यमान अन् गौरवशाली इतिहास भारतियांना अवगत करावा, ही अपेक्षा !
भारतीय पराक्रमी राजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणे, यासाठी सरकारने पावले उचलावीत ! |