‘१०.११.२०२२ या दिवशी रात्री ८.३० वाजता माझ्या आईचे (श्रीमती सुनंदा शांताराम काते यांचे) निधन झाले. मृत्यूसमयी तिचे वय ७४ वर्षे होते. २१.११.२०२२ या दिवशी तिचा मृत्यूनंतरचा बारावा दिवस आहे. मला आणि माझ्या यजमानांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सौ. भक्ती नित्यानंद भिसे (कै. (श्रीमती) सुनंदा काते यांची मुलगी), देवद, पनवेल.
१ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनानंतर आईने साधनेला आरंभ करणे : ‘एकदा आई परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) सार्वजनिक सभेला गेली होती. तेव्हा तिला परम पूज्यांच्या मागे पिवळा प्रकाश दिसला. तेव्हाच तिला वाटले, ‘हीच माझ्या साधनेची योग्य दिशा आहे.’ तेव्हापासून तिने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला आरंभ केला आणि घरातील सर्वांनाही साधनेकडे वळवले.
१ आ. एकाग्रतेने नामजप करणे आणि नामजपाच्या बळावर सर्व कामेही करणे : आई नामजप करायला बसली की, सलग २ घंटे बसून नामजप करत असे. ती नामजपाशी एकरूप होऊन जात असे आणि तिला भोवतालचे भान रहात नसे. वयाच्या ७४ व्या वर्षीही आई नामजपाच्या बळावर रानात जाऊन लाकडे आणणे, तसेच घरातील कामे करणे, अशी सर्व कामे करत असे.
१ इ. ‘दैनिक सनातन प्रभात’ वाचून कृती करणे : आई सकाळी लवकर उठून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत असे. ती प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचूनच घरकामाला आरंभ करत असे. त्यामध्ये आलेल्या ‘साधकांसाठी सूचना’ वाचून त्यानुसार ती कृती करण्याचा प्रयत्न करत असे.
१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : आई नेहमी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलत असे. ती आम्हाला नेहमी सांगायची, ‘‘कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी परम पूज्यांना हाक मारा. तेच तुम्हाला शक्ती देतील !’’ ‘परम पूज्य’ असे म्हटल्यावरच तिचा भाव जागृत होत असे.
१ उ. ‘श्रीकृष्णाच्या चित्रातून पिवळा प्रकाश येत आहे’, अशी आईला अनुभूती येणे : एकदा आई माझ्याकडे (देवद, पनवेल येथे) रहायला आली होती. आमच्या घरी असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून नामजप करत असतांना तिला ‘त्या चित्रातून मोठ्या प्रमाणात पिवळा प्रकाश येत आहे’, असे जाणवले.’
२. श्री. नित्यानंद भिसे (कै. (श्रीमती) सुनंदा काते यांचे जावई), देवद, पनवेल.
२ अ. नेहमी साधनेविषयी बोलणे : ‘सासूबाई माझ्याशी व्यावहारिक गोष्टींविषयी विशेष कधी बोलत नसत. त्या अधिकतर साधनेच्या संदर्भातच बोलत असत. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना मला व्यावहारिक नाते न आठवता एका ‘साधिकेशी बोलत आहे’, असे वाटायचे.
२ आ. सासूबाईंना कधीही पाहिले, तरी ‘त्या नामजपादी उपाय करत आहेत’, असे दिसायचे.
२ इ. आश्रमात जाऊन सेवा करण्याची ओढ : देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमापासून आमचे घर जवळ आहे. सासूबाई आमच्या घरी आल्यावर त्यांना आश्रमात जाण्याची आणि तेथे जाऊन सेवा अन् साधना करण्याची संधी मिळायची. त्या माझी पत्नी सौ. भक्ती आणि मुलगी कु. दुर्वा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६ वर्षे) यांच्या समवेत आश्रमात जात आणि दिवसभर तिथेच थांबत. आश्रमात जायला मिळावे, यासाठी त्या बर्याच वेळा आमच्याकडे येत आणि १ – २ आठवडे रहात असत.
२ ई. सासूबाईंच्या सान्निध्यात साधनेचे गांभीर्य वाढणे : सासूबाई आमच्या घरी रहायला आल्यावर माझा नामजप चांगला होत असे. माझ्या अधिकाधिक प्रार्थना आणि कृतज्ञता होत असत. त्या कालावधीत माझे नामजपादी उपाय करण्याचे गांभीर्यही वाढायचे.
२ उ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ‘आजींमध्ये देवाप्रती पुष्कळ भाव आहे’, असे सांगणे : एकदा आम्हाला (मला, माझ्या पत्नीला आणि आमची मुलगी दुर्वा हिला) देवद आश्रमात बोलावले होते. त्या दिवशी सासूबाई आमच्याकडेच होत्या. आम्ही सासूबाईंना समवेत घेऊन आश्रमात गेलो. तेव्हा पू. (सौ.) अश्विनी पवार खोलीत आल्या असतांना म्हणाल्या, ‘‘दुर्वाच्या आजींमध्ये देवाप्रती पुष्कळ भाव आहे.’’
२ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला भाव : सासूबाईंच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच त्या सर्व प्रसंगांमधून बाहेर पडणे शक्य झाले’, असे त्या नेहमी सांगत. याविषयी सांगतांना त्यांचा कृतज्ञताभाव इतका दाटून येत असे की, त्यांचे बोलणे ऐकतांना माझाही भाव जागृत होत असे.’