१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांची भेट झाल्यावर त्यांचे प्रीतीमय बोलणे ऐकतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईच बोलत आहेत’, असे जाणवणे
‘माझ्या पत्नीची, सौ. अरुणाची भाची चि.सौ.कां. प्रतिभा (आताची सौ. राधिका राहुल मराठे) हिचा १३.१२.२०२१ या दिवशी देवद, पनवेल येथील आश्रमात विवाह होता. त्यासाठी मी आणि सौ. अरुणा १२.१२.२०२१ या दिवशी आश्रमात गेलो होतो. त्याच दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार चि.सौ.कां. प्रतिभाला आणि तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वधूपक्षाच्या खोलीत आल्या. प्रतिभा आणि तिचे कुटुंबीय पू. ताईंना प्रथमच भेटत होते, तरीही पू. ताई पुष्कळ आपुलकीने त्यांची चौकशी करत होत्या. ‘जणूकाही ते स्वतःचेच नातेवाईक आहेत’, अशा आत्मीयतेने त्या त्यांच्याशी बोलत होत्या. ‘त्यांच्या बोलण्यातून प्रीती ओसंडून वहात आहे’, असे मला वाटत होते. त्यांचे बोलणे ऐकतांना मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईच बोलत आहेत’, असे जाणवत होते.
२. पू. अश्विनीताईंनी वधूला आणि तिच्या माता-पित्यांना सकारात्मक दृष्टीकोन देणे
‘विवाहानंतर साधना कशी करायची ?’, हे पू. ताई प्रतिभाला सांगत होत्या. विवाहानंतर ती प्रसारातील सेवा करणार होती. तिच्या मनातील त्याविषयीची भीती घालवण्यासाठी त्या तिला सकारात्मक ऊर्जा देत होत्या. प्रतिभाच्या आई-वडिलांनाही धीर देत विवाह समारंभात ‘परात्पर गुरुदेवांच्या प्रती भाव आणि कृतज्ञता कशीठेवायची ?’, हे पू. ताईंनी सांगितले.
त्यांच्या चैतन्यमय आणि ममतामयी वाणीने सर्वांचाच भाव जागृत झाला. मलासुद्धा पुष्कळ दाटून येऊन त्यांच्याशी बोलण्यासाठी शब्दच सुचत नव्हते. पू. ताई सर्वांना भेटून गेल्यावर त्यांच्याप्रती आणि परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
– श्री. अजित तावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२१)
लाभली ऐसी आई सांभाळ पुत्रवत् करी ।
अंतरात माझ्या भाव ऐसा दाटे ।
श्री महालक्ष्मी साक्षात् समोर उभी, असे वाटे ।। १ ।।
माया, ममता, प्रीती अन् प्रेरणा सर्व तिच्या ठायी ।
सहजची आपुले करूनी सार्यांना प्रेम देई ।। २ ।।
जशी रामनाथी आश्रमात सद्गुरु बिंदाताई (टीप १) ।
तशी देवद आश्रमात असे पू. अश्विनीताई ।। ३ ।।
वर्षाव प्रेमाचा सर्वांवरी करतसे पू. ताई ।
साधनेचा संस्कार साधकांवर नित्य होई ।। ४ ।।
धन्य झालो आम्ही, धन्य सारे देवदवासी (टीप २) ।
लाभली ऐसी आई सार्यांचा पुत्रवत् सांभाळ करी ।। ५ ।।
कृतज्ञ आम्ही सारे श्री गुरुचरणी ।
घडवली अशी संतरत्ने ज्यांनी ।। ६ ।।
कसा होऊ मी त्यांचा उतराई ।
शब्द मज सुचेनात आता काही ।। ७ ।।
कृतज्ञतेस असती शब्दही अपुरे ।
अर्पण करतो मी ही काव्यसुमने ।। ८ ।।
टीप १ : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
टीप २ : देवद आश्रमातील साधक
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |