छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाचा ‘लँड जिहाद’ !
दुर्ग (छत्तीसगड) – येथील छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाने शहरातील नयापारा, कायस्थ पारा, प्रेस कॉम्प्लेक्स, पंचशील नगर आदी भागांतील शेकडो एकर भूमीवर दावा केला असून तहसीलदार कार्यालयाला नोटीस पाठवली आहे. यावर कार्यवाही करतांना तहसीलदार कार्यालयाने संबंधित भागांतील स्थानिकांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून आक्षेप मागितले आहेत. त्यामुळे शहरवासीय संतप्त झाले आहेत. ‘ज्याठिकाणी आमच्या अनेक पिढ्या रहात आल्या आहेत, त्या भूमीवर वक्फ बोर्ड दावा कसा करू शकतो ?’, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्डाने दावा केलेल्या भूमीमध्ये तहसील कार्यालयाच्या भूमीचाही समावेश आहे.
याविषयी माहिती मिळताच स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना तत्परतेने संघटित झाल्या. त्यानंतर त्यांनी पीडित हिंदूंसह शेकडोंच्या संख्येने तहसील कार्यालय गाठले. तेथे सर्वांनी वक्फ बोर्डाचा दावा रहित करण्याची मागणी केली, तसेच घोषणाबाजीही केली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, आदित्य वाहिनी, हिंदु जागृती मंच, हिंदु युवा मंच, हिंदु समूह पूजा समिती, तसेच हिंदु जनजागृती समिती यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांकहून पीडित हिंदूंना साहाय्य करण्यासाठी ‘दावा आपत्ती पत्र’ भरण्यासाठी साहाय्य करण्यात येत आहे.