नागपूर – भारतातील दलित आणि आदिवासी यांचे बहुसंख्य प्रश्न हे हिंदु समाजव्यवस्था, हिंदु धर्मव्यवस्था आणि हिंदु परंपरा यांच्याशीच निगडित असून त्यांच्यात पालट होणे आवश्यक आहे. हे पालट घडवायचे असतील, तर आम्हाला हिंदूंशी शत्रुत्व घेऊन चालणार नाही, तर समन्वयातूनच हे सर्व प्रश्न सोडवून नवा समाज घडवता येईल. दलितांवरील अन्यायासाठी संपूर्ण हिंदु समाजालाच दोषी ठरवणे अन्यायकारक होईल, असे प्रतिपादन दलित मराठी साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी ६ नोव्हेंबर या दिवशी येथे केले. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
शरणकुमार लिंबाळे म्हणाले की,
१. दलित साहित्य हे अन्यायाविरुद्ध बोलणारे आहे; मात्र साहित्यातून ‘सर्वच हिंदूंनी आपल्यावर अन्यायच केला’ ही भावना व्यक्त होणे चुकीचे आहे.
२. प्रत्येक हिंदु माणसाला समोर ठेवून समन्वयाची भूमिका साधण्यासाठी जाती-धर्माच्या पुढे जात मी संवाद साधला.
३. माझे साहित्य हे समाजपुरुषाशी साधलेला संवाद आहे. अन्यायासाठी संपूर्ण हिंदु समाज उत्तरदायी नसतांनाही आपण समाजाला दोषी ठरवले आणि अकारण शत्रुत्व वाढवले.
४. आम्ही अत्याचार करणारा गुन्हेगार समोर आणला, तर उर्वरित सहृदय हिंदू आपल्या बाजूनेही उभे रहातील; मात्र आम्ही संपूर्ण हिंदु समाजालाच दोष दिला, तर हिंदु समाजही आपल्या विरोधात एकवटेल आणि संघर्ष वाढतच राहील.
५. काही राजकीय शक्ती संविधानाला धोका असल्याची अकारण ओरड करून त्याचे राजकारण करतात.