१३ व्या वर्षी प्रेमात अन् १५ व्या वर्षी नात्यात…कोवळ्या वयात मन भलतेच गुंते !

‘मध्यंतरी नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. ते प्रकरण सर्वत्र गाजले. यानिमित्ताने समाजात आणि कायद्यात काळानुसार झालेले पालट, वयात येणार्‍या मुलांची झपाट्याने पालटलेली शारीरिक आणि मानसिक स्थिती या सगळ्यांचा सखोल विचार व्हायला हवा. ‘पॉक्सो’ कायदा आपल्या कोवळ्या मुलांच्या संरक्षणासाठी बनवला गेला आहे. या कायद्यामुळे मुलामुलींचे लैंगिक शोषण थांबवण्यास मोठा लाभ होत आहे. हा कायदा होण्यापूर्वी पुष्कळ निष्पाप बालिका लैंगिक अत्याचारांना बळी पडत होत्या आणि गुन्हेगार मात्र मोकाट सुटत होते.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

१. पालकांनी किशोरवयीन मुलामुलींवर बंधने घालून त्यांचा कोंडमारा करण्यापेक्षा त्यांना प्रेमाने जपणे आवश्यक !

‘सोळावं वरीस धोक्याचं गं…’ ही म्हण आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. तरुणपणी मला पुष्कळ राग यायचा या म्हणीचा आणि ही म्हण ऐकवणार्‍यांचाही ! ‘उगाच काय कटकट लावली आहे’, असे वाटायचे. आता स्त्रीरोगतज्ञ म्हणून अनेक पावसाळे बघितल्यावर ही म्हण लिहिणार्‍या पूर्वजांच्या बुद्धीमानतेचे कौतुक वाटल्याविना रहात नाही. सध्या तर हे अल्लड आणि भावनाविवश वय १६ वरून १२-१३ वर्षांवरच आले आहे. मुलींची पाळी चालू होण्याचे वय अल्प झाल्यामुळे त्यांना लैंगिक भावनांची जाणीवही अल्प वयातच होऊ लागली आहे. त्यातून अल्पवयात लैंगिक संबंध चालू होण्याचे प्रमाण वाढत आहे; पण म्हणून घाबरून जाऊन या मुलींवर बंधने घालून त्यांचा कोंडमारा करणे, हेही अत्यंत चुकीचे ठरते. या कोवळ्या आणि निष्पाप कळ्यांचे सुरेख फुलात रूपांतर होईपर्यंत त्यांना प्रेमाने केवळ जपायचे.

२. आरोग्याविषयी चर्चा करण्यासाठी मुलींसमवेत मोकळा संवाद साधा !

प्रतिकात्मक चित्र

आजकाल बर्‍याच शाळांमध्ये आम्ही स्त्रीरोगतज्ञ इयत्ता ५ वीपासूनच मुलींना आरोग्याविषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी जातो. यात मुलींचे शरीर, मासिक पाळी चालू होण्यापूर्वी आणि नंतर शरिरात होणारे पालट, तसेच लैंगिक आकर्षण यांविषयी आम्ही संवाद साधतो. बर्‍याच वेळा पालकांची मानसिकता अशी असते की, मुलींशी नको त्या विषयांवर बोलू नका, उगीच त्यांच्या मनात वेगळेच विचार चालू होतील ! या मनोवृत्तीवरून अजून एक म्हण आठवली, ती म्हणजे ‘कोंबडं झाकून ठेवलं, तरी सूर्य उगवायचा रहात नाही.’ या विषयांवर जर आपण मुलांशी बोललो नाही, तरी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या मैत्रिणी आणि संगणकीय ज्ञानजालावर उपलब्ध असलेली कधी कधी अशास्त्रीय ठरणारी माहिती हे त्यांचे माहितीचे स्रोत होऊ शकतात. त्यातून अपसमज आणि अंधश्रद्धा यांत भर पडू शकते. ‘संगणकीय ज्ञानजालावर दिसणारी सगळी माहिती खरीच असते’, ही सर्वांत मोठी अंधश्रद्धा आहे. तुम्ही कोणत्या संकेतस्थळावर जाऊन माहिती शोधता, हे महत्त्वाचे आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश हा की, मुलांसमवेत मनमोकळा संवाद ठेवला, तर त्यांच्या मनात काय चालले आहे, याची आपल्याला कल्पना येऊ शकते.

३. समज येण्यापूर्वी मुलामुलींनी शारीरिक संबंधांमध्ये गुंतणे, ही मोठी समस्या !

सध्या समज येण्यापूर्वीच मुलेमुली शारीरिक संबंधांमध्ये गुंतत आहेत, ही मोठी समस्या आहे. सध्या अगदी १२-१३ व्या वर्षांपासूनच मुलामुलींना मित्र-मैत्रिणी असतात. अपरिपक्व वयात दूरचित्रवाहिनीवरील मालिका आणि चित्रपट मुलांना खरेतर पचवता येत नाहीत अन् मग ते नको त्या गोष्टी करायला जातात. यात मित्रमंडळींचा दबाव हाही मोठा घटक असतो. यातून अल्पवयीन मुलगी जर गर्भार राहिली, तर परिस्थिती अतिशय गंभीर वळण घेऊ शकते; कारण कायद्यानुसार हा बलात्कार मानला जातो. ‘१८ वर्षांहून अल्पवयाची मुलगी लैंगिक संबंधाला अनुमती देण्याएवढी परिपक्व नसते’, असे कायदा मानतो आणि ते खरेही आहे. शारीरिक संबंध परस्पर सहमतीने झाले असतील आणि मुलगा वयाने लहान असेल, तरीही तो कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. नाशिकच्या प्रकरणात मुलाचे वय अधिक आहे; पण अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीनेही लैंगिक संबंध ठेवणे, हे कोणत्याही वयातील मुलांसाठी सर्वच दृष्टींनी धोकादायकच आहे.

४. लैंगिक अत्याचारांविषयी मुलांच्या मनात जागरूकता निर्माण करावी !

लहान आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार ही एक ज्वलंत समस्या आहे. या प्रकरणांमध्ये बर्‍याचदा गुन्हेगार हे नातेवाईक अथवा शेजारी असतात. त्यामुळे लहान वयापासूनच मुलांच्या मनात याविषयी जागरूकता निर्माण करणे, पालकांनीही डोळ्यांत तेल घालून वयात आलेल्या मुलीकडे लक्ष ठेवणे, तिने कुणाची तक्रार केल्यास लगेचच अन्वेषण करणे, अशा गोष्टींमुळे आपल्या मुलींच्या संदर्भात अप्रिय घटना घडणे आपण टाळू शकतो.

५. मुलामुलींवर निर्बंध घालण्यापेक्षा त्यांना खंबीर मानसिक आधार आणि प्रेम देऊन, तसेच शिस्त लावून त्यांची नैतिक जागृती निर्माण करणे आवश्यक !

वयात आल्यावर मुलामुलींना एकमेकांचे आकर्षण वाटणे साहजिक आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. ‘आता तुमचे वय केवळ मैत्री करायचे आहे, मित्रमैत्रिणींचे गट निश्चित असावेत; पण केवळ एकाशी वेगळे नाते जोपासण्याची ही वेळ नाही’, हे त्यांना पटवून द्यावे. ‘तुमचे शरीर तुम्हीच जपायचे आहे. पुढचा-मागचा विचार न करता कोणत्याही व्यक्तीशी लैंगिक संबंध, म्हणजे स्वतःच्या शरिराशी केलेली प्रतारणा आहे. असे केल्यास याचे शरीर आणि मन यांच्यावर पुष्कळ दूरगामी परिणाम होऊ शकतात’, अशा प्रकारे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. मुलांना केवळ पोकळ नैतिकता आणि तथाकथित संस्कृती यांचे धडे देण्याचा प्रयत्न केला, तर ते त्याकडे
दुर्लक्ष करतात.

६. पालकांनी मुलांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक !

पालक करत असलेली सर्वांत मोठी चूक, म्हणजे मुलांच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यावर बंदी आणणे. तरुण उसळते रक्त तुम्ही अधिक काळ थोपवून धरू शकत नाही, ते अजूनच उसळते. त्याला योग्य प्रवाहाची दिशा दिली, तरच ते आटोक्यात रहाते. आपल्या मुलांची लैंगिकता स्वीकारणे, हे भारतीय पालकांना अजूनही अवघडच जाते. या वयातील मुलांकडून छोट्या-मोठ्या चुकाही होणारच; पण चुका केल्यावर त्या पालकांकडे येऊन मान्य करण्याचा विश्वास पालकांनी मुलांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे.

७. नाजूक वेलींचा कणखर वृक्ष होऊ द्या !

बहर येऊ घातलेल्या या नाजूक वेली आता भराभर मोठ्या होणार आहेत. पालकांनी त्यांना खंबीर मानसिक आधार, शिस्त आणि प्रेम यांचे खतपाणी घातले की, त्यांचा कणखर वृक्ष होईल एक दिवस ! जो आई-वडिलांना शीतल छाया देत राहील..हो ना ?
– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे. (साभार : फेसबुक पेज)