आमच्या महत्त्वपूर्ण ठिकाणांवर ४० रशियन क्षेपणास्त्रांचा मारा ! – युक्रेनचा दावा

रशिया-युक्रेन संघर्ष

प्रतिकात्मक छायाचित्र

कीव (युक्रेन) – रशियाने ३१ ऑक्टोबर या दिवशी युक्रेनमधील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. यांमध्ये प्रामुख्याने विद्युत् प्रकल्पांचा समावेश असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. ३१ ऑक्टोबरच्या सकाळी रशियाने राजधानी कीवसह देशभरात स्फोट घडवून आणले. त्यामुळे देशातील सर्व प्रांतांतील संकटकालीन अलार्म वाजवण्यात आले, असे युक्रेनी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचे साहाय्यक अ‍ॅन्टन गेराशचेंको यांनी दावा केला आहे की, ४० रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या विविध महत्त्वपूर्ण ठिकाणांना लक्ष्य केले असून जनतेने सुरक्षित ठिकाणी रहावे.

१. कीवचे महापौर विटॅली क्लिट्सको यांनी सांगितले की, रशियन आक्रमणामुळे शहरातील साडेतीन लाख इमारतींमधील वीज तोडावी लागली, तसेच तेथील ८० टक्के लोकांना पाणी मिळू शकले नाही.

२. खार्कोवचे महापौर इगोर तेरेखोव यांच्या मते शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणी दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यामुळे येथील मेट्रोचे काम खोळंबले.

३. चेरकासी आणि विनित्सा या शहरांतील महापौरांनीही अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

४. युक्रेनमधील प्रमुख विद्युत् आस्थापन ‘युक्रेनर्जी’च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, रशियन आक्रमणामुळे राष्ट्रीय विद्युत् जोडणीची अभूतपूर्व हानी झाली असून देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या वेळी ‘ब्लॅकआऊट’ (वीज तोडणे) करण्यात येत आहे.

५. काळ्या समुद्रातील सेवास्तोपोल या रशियाच्या नौदलाच्या तळावर युक्रेनने ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या आक्रमणात रशियाची एक युद्धनौका नुकतीच बुडाली. युक्रेनी सैन्याने रशियावर केलेल्या या आक्रमणाचा सूड उगवण्यासाठीच रशियाकडून अशा प्रकारे क्षेपणास्त्रांचा मारा करून महत्त्वपूर्ण विद्युत् प्रकल्प आणि अन्य ठिकाणे यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.