(म्हणे) ‘ऋषी सुनक गोमांस आणि मद्य यांपासून दूर असणे, ही सवर्णांची विचारसरणी !’

ब्रिटनचे वृत्तपत्र ‘द गार्डियन’चा हिंदुद्वेष्टा लेख प्रसारित !

लंडन – ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक हे हिंदु आणि मूळचे भारतीय असल्याने त्यांच्यावर तेथील प्रसिद्ध दैनिक ‘द गार्डियन’ने एका लेखाद्वारे टीका केली आहे.  लेखक पंकज मिश्रा यांना ‘ब्रिटनला अल्पसंख्यांक समुदायातील पंतप्रधान लाभणे, हा ऐतिहासिक क्षण आहे’, असे वाटत नाही. ते म्हणतात की, सुनक हे गोमांस आणि मद्य यांपासून दूर असतात. याला त्यांनी ‘उच्चवर्णियांची संस्कृती’ म्हणून हिणवले आहे. येथे हिंदूंच्या नावाने सवर्णांना अपशब्द वापरण्यात आले आहेत. सुनक स्वत:समवेत श्री गणेशाची मूर्ती ठेवत असल्यावरूनही मिश्रा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

१. ‘हिंदु सुप्रीमॅसिस्ट्स’ या संज्ञेचा वापर करून मिश्रा म्हणतात की, सुनक हे भारतातील राष्ट्रवादींसाठी ‘देशी ब्रो’ (भारतीय असलेले विदेशी भाऊ) आहेत. राष्ट्रवादी हिंदूंना हिणवण्यासाठी साम्यवादी आणि इस्लामवादी लोक ‘हिंदु सुप्रीमॅसिस्ट्स’ या संज्ञेचा वापर करतात. याचा अर्थ हिंदू ‘सवर्ण-शूद्र’ अशा प्रकारे जातीनिहाय भेदभावाचे राजकारण करतात.

  हिंदुद्वेषी लेखक पंकज मिश्रा

२. या लेखामध्ये असे म्हणण्यात आले आहे की, राष्ट्रवादी हिंदू असा विचार करतात की, सुनक हे भारताचे गुप्त ‘एजंट’ (दलाल) आहेत.

३. सुटाबुटात असलेले सुनक हे धार्मिक हिंदू वाटत नाहीत, ज्या प्रकारे म.गांधी वाटत असत. ‘आज भारत गांधीवादी मूल्यांना विसरत असून सत्ता आणि पैसा यांच्यामागे धावत आहे’, असेही या लेखात म्हणण्यात आले आहे.

४. ‘सुनक यांच्याविरोधात लेख लिहिण्यासाठी मुद्दामहून एका भारतीय लेखकाची निवड करण्यात आली, जेणेकरून वाद निर्माण होणार नाही’, अशी या लेखावरून सामाजिक माध्यमांमध्ये चर्चा होत आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांवर अत्याचार होत असल्याची बांग ठोकणारी ‘द गार्डियन’सारखी प्रसारमाध्यमे त्यांच्याच देशात अल्पसंख्यांक समुदायातील नेत्याला धारेवर धरतात. यातून त्यांचा हिंदुद्वेष्टा दुटप्पीपणा लक्षात येतो !
  • ‘हिंदूंचे वर्चस्व वाढत आहे’, ही ‘द गार्डियन’ यांसारख्या वृत्तपत्रांची खरी पोटदुखी आहे. असे लेख ही केवळ त्याची परिणती आहे, हे जाणा !