नरेंद्र मोदी महान देशभक्त असून त्यांच्या नेतृत्वात भारताचे भविष्य उज्ज्वल !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी

मॉस्को (रशिया) – पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान देशभक्त आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. ‘मेक इन इंडिया’चा त्यांचा विचार अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्र या दोन्ही अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. काही गोष्टी मर्यादित करण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न होत असतांनाही ते स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पाठपुरावा करण्यास सक्षम आहेत. भारताची जागतिक घडामोडींमध्ये वाढती भूमिका असेल, याची मला निश्तिची आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांचे कौतुक केले. मॉस्कोमधील ‘व्हाल्डाई डिस्कशन क्लबच्या परिषदे’मध्ये बोलत होते. ‘भारत आणि रशिया यांच्यामध्ये चांगले नाते असून कोणत्याही सूत्रांवरून आमच्यात मतभेद नाहीत’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

पुतिन पुढे म्हणाले की,

१. ब्रिटीश वसाहत ते एका स्वतंत्र देशापर्यंत भारताने फार मोठा पल्ला गाठला आहे. भारत जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे. त्यामुळे भविष्य त्याचेच आहे. ही प्रत्येक भारतियासाठी गर्वाची गोष्ट आहे. आमचे भारताशी विशेष संबंध आहेत. आमच्यामध्ये कधीही कठीण समस्या निर्माण झाल्या नाहीत. आम्ही एकमेकांना पाठिंबा दिला असून सध्याही तेच करत आहोत. भविष्यातही असेच होईल, याची मला निश्‍चिती आहे.

२. पंतप्रधान मोदी एखाद्या ‘आईस ब्रेकर’सारखे आहेत. त्यांना आपल्या नागरीकांच्या हितांचे संरक्षण चांगल्या पद्धतीने जमते. मोदी स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्यात तरबेज असणार्‍या लोकांपैकी एक आहेत. अनेक पाश्‍चिमात्य देशांनी भारतावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला; पण मोदी यांनी त्यांची इच्छा धुडकावून लावली.

३.  रशियासाठी भारत नेहमीच विशेष राहिला आहे. त्यांचे आणि आमचे संबंध पुष्कळ जुने आहेत. आमच्यात प्रदीर्घ काळापासून संबंध आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही हे विशेष !