मालवण (सिंधुदुर्ग) येथे श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांची सजवण्यात आलेली पालखी

मालवण – येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा  भाऊबिजेकरता आणि गावभेटीकरता काढण्यात येणारा ऐतिहासिक पालखी सोहळा २६ ऑक्टोबर या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, देवतांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष देवाचे दर्शन झाल्याने कृतकृत्य झालेल्या मालवणवासियांसह भाविकांनी श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचे मनोहारी रूप डोळ्यांत साठवून ठेवले.

२६ ऑक्टोबर या दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुपारी पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. श्री देव रामेश्वर मंदिरातून सजवलेली पालखी प्रथम श्री देव नारायण मंदिरात नेण्यात आली. तेथून श्री पावणाईदेवी, श्री भावईदेवी यांची भेट घेऊन सांगणे केले गेले. तेथून पुन्हा पालखी श्री देव रामेश्वर मंदिरात आणून श्री देव रामेश्वराला गावभेटीचे आमंत्रण दिले गेले. त्यानंतर पालखीत विराजमान झालेले श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली. श्री सातेरीदेवी, वायरी-भूतनाथ येथील श्री देव भूतनाथ, दांडी समुद्रकिनारी असलेला ऐतिहासिक ‘मोरयाचा धोंडा’ (छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमीपूजन केलेले स्थळ), दांडेश्वर मंदिर येथे भेट झाल्यावर श्री केळबाईदेवी मंदिरात पालखीचे आगमन झाले. श्री केळबाईदेवी ही श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांची बहीण असल्याने येथे भाऊबिजेचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तेथून जोशी मांड, नंतर बंदर जेटीमार्गे सोमवार पेठेतील श्री रामेश्वर मांडावर येऊन दर्शनासाठी थांबली. येथे भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर पालखी बाजारपेठमार्गे भरड नाक्यावर येऊन रात्री विलंबाने पुन्हा श्री देव रामेश्वर मंदिरात पोचली अन् सोहळ्याची सांगता झाली.

पालखीच्या स्वागतासाठी अवघे मालवण शहर सिद्ध झाले होते. पालखीच्या मार्गावर घरोघरी सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. घरोघरी पणत्यांसह विजेची रोषणाई करण्यात आली होती. मार्गावर अनेक ठिकाणी सुवासिनींनी पंचारती ओवाळून पूजन केले. एकूणच पालखी सोहळ्यामुळे येथील वातावरण चैतन्यमय आणि आनंददायी बनले होते.