वाहनाचा विमा उतरवण्याच्या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे लक्षात घ्या !

१. ‘वाहन विमा’ म्हणजे काय ?

अपघातात वाहन, मालमत्ता यांची हानी वा जीवितहानी झाल्यास ठराविक मुदतीमध्ये त्याची हानीभरपाई होण्यासाठी हमी (‘गॅरन्टी’) देणारी व्यवस्था म्हणजे ‘विमा’ ‘इन्शुरन्स’ असे म्हणता येईल. विमा हा वाहनधारक आणि विमा आस्थापन यांच्यामध्ये होणारा एक करार आहे.

कोणतेही वाहन सार्वजनिक रस्त्यावर चालवण्यापूर्वी त्याचा विमा उतरवणे बंधनकारक आहे. ‘मोटार वाहन अधिनियम १९८८’ नुसार दुचाकी वा चारचाकी वाहनाचा विमा न उतरवणे, हा दंडनीय अपराध आहे. विमा न उतरवता वाहन चालवल्यास वाहनधारकाला १ सहस्र रुपयांपर्यंत दंड किंवा ३ मासांपर्यंतचा कारावास होऊ शकतो.

२. विमा उतरवल्याने होणारे लाभ

अ. वाहन अपघाताच्या तीव्रतेनुसार वाहनधारकाला लहान वा मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसू शकते. त्यामुळे अपघातानंतर वाहनाची डागडुजी सहजतेने होण्यासाठी वाहनाचा विमा उतरवलेला असणे आवश्यक आहे.

आ. काही वेळा वाहनाचा अपघात झाल्यास त्या अपघातामध्ये स्वतःच्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या वाहनाची हानी होते. एखाद्या वेळी जीवितहानीही होण्याची शक्यता असते. अपघातात वाहन धडकल्यामुळे मालमत्तेचीही (उदा. कुंपण, प्रवेशद्वार वा भिंत यांचीही) हानी होऊ शकते. अशा वेळी संबंधित वाहनाचा विमा उतरवलेला नसल्यास ही सर्व हानीभरपाई वाहनधारकाला सोसावी लागते. अशा प्रसंगी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागून आर्थिक हानी होते आणि मनस्तापही सहन करावा लागतो.

इ. वाहन चोरीला जाण्याच्या घटना, तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीतही वाहनाचा विमा उतरवलेला असणे लाभदायी ठरते.

विमा उतरवलेल्या वाहनाची हानी झाल्यावर वाहनधारक विमा आस्थापनाकडून (‘इन्शुरन्स’ कंपनी’कडून) आर्थिक संरक्षण किंवा परतफेड मिळवू शकतात.

३. विमा कधी उतरवायचा ?

नवे वाहन खरेदी केल्यानंतर विमा उतरवणे आवश्यक आहे. सध्या वापरात असलेल्या वाहनाचा विमा अगोदर उतरवला असल्यास त्याची मुदत संपण्यापूर्वीच विम्याचे नूतनीकरण करावे. खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने वाहनाचा विमा उतरवता येईल. कोणत्या पद्धतीने विमा उतरवायचा, हे वाहनधारकाने ठरवावे; पण विमा उतरवणे बंधनकारक आहे.

४. वाहन विम्याचे प्रकार 

४ अ. ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स’ (Comprehensive Insurance) : या पद्धतीचा विमा उतरवला असल्यास वाहनाचा अपघात झाल्यास स्वतःच्या, तसेच समोरील व्यक्तीच्या (दुसर्‍याच्या) वाहनाची हानीभरपाई मिळते. अपघातामध्ये दोन्ही वाहनांमधील कुणाची जीवितहानी अथवा मालमत्तेची हानी झाल्यास त्याची भरपाई मिळते. त्यामुळे हा विमा उतरवल्यास त्यात ‘थर्ड पार्टी’ विमा आपोआप अंतर्भूत होतो.

या विम्याला ‘सर्वसमावेशक विमा’ असेही म्हणता येईल. नवे वाहन खरेदी केल्यानंतर पुढील १० वर्षांपर्यंत हा विमा काढू शकतो; पण ते बंधनकारक नाही.

४ आ. ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ (Third Party Insurance) : या पद्धतीने प्रत्येक वाहनाचा विमा उतरवणे बंधनकारक आहे. वाहन खरेदी करून १० वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यास याच पद्धतीने विमा काढावा लागतो. ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ असल्यास अपघातात समोरच्या वाहनाची, मालमत्तेची हानी झाल्यास अथवा जीविताला धोका पोचल्यास त्याला हानीभरपाई मिळते. स्वतःच्या वाहनाची हानीभरपाई या विमापद्धतीद्वारे मिळत नाही.

५. वाहन विम्याची रक्कम वेळेत भरण्याचे महत्त्व !

वाहनधारकाने कोणत्या पद्धतीने विमा उतरवायचा, हे निश्चित केल्यावर त्याला प्रतिवर्षी विमा आस्थापनाला विशिष्ट रक्कम (‘प्रिमियम’) भरावी लागते. ती रक्कम भरण्यात खंड पडल्यास विमा आस्थापनाकडून वाहनाची अधिकृतरित्या तपासणी (‘इन्स्पेक्शन’) करून घ्यावी लागते. त्यासाठी वाहन घेऊन जाणे, तपासणीसाठी अतिरिक्त शुल्क देणे, आर्.सी. बुक पडताळणी करणे आदी गोष्टींना सामोरे जावे लागते.

बरेच वाहनधारक विमा आस्थापनाला विम्याची रक्कम रोख स्वरूपात देतात, तर काही जण धनादेशाने अथवा ‘कार्ड पेमेन्ट’द्वारे जमा करतात. आस्थापनाला जोपर्यंत विम्याची रक्कम प्राप्त होत नाही, तोपर्यंत विम्याची ‘पॉलिसी’ अंमलात आणता येत नाही. काही कारणास्तव विमा रक्कम मिळाली नाही, तर निश्चित झालेली ‘पॉलिसी’सुद्धा रहित होते. त्या काळात वाहनाच्या संदर्भात ‘क्लेम’ झाल्यास त्याची रक्कम वाहनधारकाला विमा आस्थापनाकडून मिळत नाही.

६. ‘नो क्लेम बोनस’विषयीची माहिती

वाहनधारकाने विम्याची रक्कम भरली आणि वाहनाच्या संदर्भात कोणताही क्लेम केला नाही (म्हणजे वाहनाची कोणत्याही प्रकारची हानीभरपाई आस्थापनाकडे मागितली नाही), तर त्याला विशिष्ट रक्कम विमा आस्थापनाकडून ‘बोनस’ म्हणून मिळते. त्यामुळे वाहनधारक विमा आस्थापनाला भरत असलेल्या विमा रकमेत सवलत प्राप्त होते. याला ‘नो क्लेम बोनस’ असे म्हटले जाते. सवलतीविषयीची माहिती पुढील सारणीत दिली आहे.

हा बोनस केवळ ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स’लाच मिळतो. ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ला मिळत नाही. अगोदरच्या पॉलिसीची समयमर्यादा संपल्यानंतर ३ मासांपर्यंत ‘बोनस’ मिळू शकतो. ३ मासांच्या आत पॉलिसीचे नूतनीकरण केले नाही, तर बोनस मिळत नाही.

७. वाहन खरेदी करतांना विम्याच्या हस्तांतरणाविषयी करावी लागणारी प्रक्रिया

वाहन प्रथम आपल्या नावावर करून घ्यावे. नंतर आपले नाव असलेले ‘आर्.सी. बुक’ आणि अगोदरची विमा ‘पॉलिसी’ विमा आस्थापनाला दाखवून विमा आपल्या नावावर हस्तांतरित करून घ्यावा. वाहन आपल्या नावावर करण्याच्या प्रक्रियेपासून १४ दिवसांच्या आत वरील हस्तांतरण करणे अपेक्षित असते, अन्यथा वाहनाची अधिकृत तपासणी करून घ्यावी लागते. त्या काळात काही ‘क्लेम’ झाला, तर तो ग्राह्य धरला जात नाही. बर्‍याचदा ‘आर.सी. बुक’ प्राप्त व्हायला बराच वेळ लागतो. त्यामुळे ‘आर.सी. बुक’ची पावती दाखवून १४ दिवसांच्या आत विमा हस्तांतरण करणे सोयीस्कर ठरते.

प्रत्येक वाहनधारकाने स्वत:च्या वाहनाचा विमा उतरवला आहे ना, याची निश्चिती करावी. विमा उतरवला नसल्यास त्याची सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. विम्याच्या कागदपत्रांच्या मूळ, तसेच छायांकित (झेरॉक्स) प्रती वाहनात ठेवाव्यात अन् छायांकित (झेरॉक्स) प्रती घरीही ठेवाव्यात.

८.विमा उतरवलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास काय करावे ?

वाहनाचा अपघात झाल्यावर लगेचच त्याची कल्पना विमा आस्थापनाला लेखी स्वरूपात द्यावी. वाहनांची मोठी हानी झाली असल्यास, जीवितहानी झाल्यास, समोरच्याची चूक असल्यास किंवा काही विवाद असल्यास त्वरित पोलीस पंचनामा करून घ्यावा आणि ते वाहन न वापरता ‘गॅरेज’मध्ये ठेवावे.

वाहनाच्या हानीचा संभावित खर्च (एस्टिमेट), ‘क्लेम फॉर्म’, ‘आर.सी. बुक’, वाहनचालकाच्या वाहन परवान्याची प्रत, अधिकोषातील माहिती आदी कागदपत्रे संभावित खर्चाच्या अर्जाच्या समवेतच द्यावीत. ही कागदपत्रे जमा केल्यावर विमा आस्थापनाच्या वतीने एक सर्वेक्षक (सर्व्हेअर) वाहनाची पहाणी करतो आणि वाहनाच्या एकूण हानीपैकी किती प्रमाणात हानीभरपाई विमा आस्थापनाकडून मिळू शकते, याविषयीचा अहवाल (रिपोर्ट) देतो आणि त्यानुसार वाहनधारकाला हानीभरपाई प्राप्त होते.