प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधातील तक्रारीसाठी दिलेली संपर्क यंत्रणा कुचकामी !    

तक्रार करण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांक आणि त्यावर स्वतंत्र माणूस ठेवणे शक्य नाही ! – विनय आहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पूर्व)

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अधिक भाडे आकारल्यास ग्राहक कार्यालयीन क्रमांकावर तक्रार करू शकतात. तक्रारीसाठी स्वतंत्र ‘टोल फ्री’ क्रमांक ठेवायचा झाल्यास त्यासाठी पैसे भरावे लागतात आणि त्यासाठी स्वतंत्र माणूस ठेवावा लागेल. आधीच मनुष्यबळ अल्प असतांना त्यासाठी स्वतंत्र माणूस ठेवणे शक्य नाही, असे मत मुंबई (पूर्व) येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना मांडले.

मुंबई – राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या आदेशानंतर ‘दिवाळीमध्ये खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची आर्थिक लूट होऊ नये’, यासाठी राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून प्रसिद्धीपत्रक काढून फसवणूक करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात दूरध्वनीवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये काही कार्यालयांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये तक्रार करण्यासाठी भ्रमणभाष क्रमांक दिला आहे, तर काहींनी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक दिला आहे.

बहुतांश दूरध्वनी किंवा भ्रमणभाष कुणी उचलतच नाहीत किंवा बंद आहेत !

तक्रार करण्याचे आवाहन केल्यावर राज्यातील विविध आर्.टी.ओ. कार्यालयांत तक्रार नोंदवण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी दूरध्वनी अथवा भ्रमणभाष यांवर संपर्क केला असता काही ठिकाणी दूरध्वनी किंवा भ्रमणभाष उचललेच गेले नाहीत, तर बहुतांश आर्.टी.ओ. कार्यालयांचे दूरध्वनी किंवा भ्रमणभाष बंद असल्याचा प्रकार उघड झाला. यातून मोटार वाहन विभागाच्या भोंगळ कारभार स्पष्ट झाला.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी विविध जिल्ह्यांतील २१ प्ररिवहन कार्यालयांत संपर्क केला असता त्यांतील ११ भ्रमणभाष बंद होते, तर ६ कार्यालयांतील भ्रमणभाष उचललेच नाहीत, केवळ ४ ठिकाणी तक्रार नोंद करून घेतली जात आहे.

भ्रमणभाष/ दूरध्वनी न उचलले गेलेले जिल्हे

मुंबई (मध्य) (२ पैकी १ भ्रमणभाष बंद), मुंबई (पश्‍चिम), सातारा, गडचिरोली, नंदुरबार आणि धाराशिव

भ्रमणभाष/ दूरध्वनी बंद असलेले जिल्हे

मुंबई (मध्य) (२ पैकी १ भ्रमणभाष बंद), मुंबई (पश्‍चिम), जळगाव, धुळे, गोंदिया
बीड, लातूर, अकलूज (सोलापूर) , श्रीरामपूर (नगर), परभणी आणि अंबाजोगाई (बीड)

भ्रमणभाष/ दूरध्वनी उचलून तक्रार नोंद करून घेणारे जिल्हे

पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मुंबई (पूर्व)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहकांना तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांकच दिला नाही !  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्याशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी ‘वैयक्तिक क्रमांक तक्रार निवारणासाठी दिला आहे’, असे सांगितले. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ‘‘प्रवासी ग्राहकांना सोयीस्कर होण्यासाठी ज्या खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या गाड्यांमध्ये संपर्क क्रमांक दिला आहे का ? किंवा प्रसिद्ध केला आहे का ?’’, असे विचारले असता त्यांनी ‘‘अद्याप असे काही केलेले नाही’’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका

१. प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील संपर्क क्रमांकाविषयी इतकी उदासीनता आहे, तर ‘नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकार्‍यांकडून तत्परतेने कार्यवाही होत असेल का ?’, असा प्रश्‍न कुणाला पडल्यास चूक ते काय ?
२. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सकडून सामान्य नागरिकांची लूट होत असल्यास तक्रार कुठे करायची ?