नगर – भारत ‘सेक्युलर’ देश असतांना देशात धर्माच्या नावावर समांतर अशी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ हलाल प्रमाणपत्राद्वारे निर्माण केली जात आहे. या हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला, तसेच राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अशा हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नगर येथील यश पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी नगर येथील व्यापारी, तसेच भाजपचे जिल्हा चिटणीस श्री महावीर कांकरिया, तसेच बजरंग दलाचे शहर संयोजक श्री. कुणाल भंडारी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री. सुमित वर्मा हे उपस्थित होते.
जिल्ह्याजिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन होत आहे. या उपक्रमात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने या वेळी करण्यात आले.
संपूर्ण देशभरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल उत्पादन मुक्त दिवाळी’ हे अभियान राबवण्यात येत आहे. हलाल प्रमाणित उत्पादने घेणे टाळा आणि ‘हलाल उत्पादन मुक्त दिवाळी’ साजरी करा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.