ठेकेदार ‘यशोधरा संस्थे’ला ९९ सहस्र रुपयांचा दंड !

श्री विठ्ठलाच्या प्रसादाच्या लाडू विक्रीमध्ये भाविकांची फसवणूक !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने लाडू बनवण्याचा ठेका नाशिक येथील ‘यशोधरा संस्थे’ला दिला आहे. या संस्थेस ७० ग्रॅमचा १ लाडू याप्रमाणे २ लाडू पॅकिंग करून १४० ग्रॅम वजन असणे बंधनकारक करण्यात आले होते; मात्र संस्थेने यापेक्षा अल्प वजनाचे लाडू सिद्ध करून मंदिर समितीला विक्रीसाठी दिले. या प्रकरणी यशोधरा संस्थेस अल्प वजनाचे (८० ते ९० ग्रॅम वजनाचे) लाडू पॅक सिद्ध करून भाविकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ९९ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याविषयीचे लेखी आदेश यशोधरा संस्थेला देण्यात आला आहे. फसवणूक करणार्‍या संस्थेचा ठेका रहित करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन काळे यांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? मंदिर समितीने याविषयी तात्काळ निर्णय घेऊन ठेका रहित करायला हवा. – संपादक)

अल्प वजनाचे लाडू मंदिर समितीला विक्रीसाठी दिले जात असल्याचे नितीन काळे यांच्या लक्षात आले. भाविकांची फसवणूक होत असल्याने त्यांनी याविषयी मंदिर समिती, वैधमापन विभागाचे जिल्हा निरीक्षक यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या; मात्र याविषयी नोंद घेण्यात आली नाही. (हे स्वतः मंदिर समितीच्या लक्षात का आले नाही ? मंदिर समितीने याविषयी तात्काळ नोंद का घेतली नाही ? कि मंदिर समिती ठेकेदाराशी संगनमत करून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक) त्यामुळे काळे यांनी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार सोलापूर येथील वैधमापन विभागाच्या अधिकार्‍यांनी मंदिर समितीच्या लाडू केंद्रावर अचानक धाड टाकून पडताळणी केली असता अल्प वजन असलेले लाडू विक्री होत असल्याचे आढळून आले. (जे मंदिर समितीला करायला हवे, ते वैधमापन विभागाला करावे लागले, हे समितीला लज्जास्पद ! – संपादक)