१. पू. सौरभ जोशी यांच्या सत्संगात असतांना सूक्ष्मातून ‘शैलपुत्रीदेवी’ आणि ‘ब्रह्मचारिणीदेवी’ यांचे दर्शन होणे
१ अ. भाववृद्धी सत्संगांत ‘शैलपुत्री’ आणि ‘ब्रह्मचारिणी’ देवींचे सूक्ष्मातून दर्शन न झाल्याने दुःख होणे अन् पू. सौरभ जोशी यांना ‘तुम्ही सूक्ष्मातून ‘शैलपुत्री’देवीचे दर्शन घडवाल का ?’, अशी प्रार्थना केल्यावर त्यांनी होकार देणे : ‘नवरात्रीच्या काळात १७.१०.२०२० आणि १८.१०.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संग होते. या सत्संगांत ‘शैलपुत्रीदेवी’ आणि ‘ब्रह्मचारिणीदेवी’ यांचे सूक्ष्मातून दर्शन घ्यायला सांगितले होते. मला त्यांचे दर्शन झाले नाही; म्हणून मी पुष्कळ दुःखी झाले. १८.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मला पू. सौरभ जोशी यांच्या सत्संगाचा लाभ झाला. त्या वेळी मी पू. सौरभदादांना म्हणाले, ‘‘पू. दादा, मला सत्संगात ‘शैलपुत्रीदेवी’ आणि ‘ब्रह्मचारिणीदेवी’ यांचे दर्शन झाले नाही; म्हणून तुमच्या चरणी प्रार्थना करते, ‘तुम्ही मला सूक्ष्मातून ‘शैलपुत्रीदेवीचे दर्शन घडवाल का ?’ तेव्हा पू. दादा हसत हसत ‘‘हो, हो. चल, चल’’, असे मला म्हणाले.
१ आ. पू. सौरभ जोशी यांनी साधिकेला डोळे बंद करायला सांगणे, नंतर शैलपुत्रीदेवीला प्रार्थना केल्यावर तिने साधिकेला दर्शन देऊन दुर्गादेवीचे सिंहारूढ रूप साधिकेच्या हृदयात विराजमान करणे : पू. दादांनी मला डोळे बंद करायला सांगितले. डोळे बंद केल्यावर ‘मी कैलासात आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मी शैलपुत्रीदेवीला प्रार्थना केली, ‘हे शैलपुत्रीमाते, तू मला दर्शन दे. मी तुला शरण आले आहे.’ त्यानंतर मला शंख आणि घंटा यांचा नाद ऐकू येऊ लागला. भाववृद्धी सत्संगात शैलपुत्रीदेवीचे जसे वर्णन सांगितले होते, तशा रूपातच ती सूक्ष्मातून माझ्यासमोर आली. तिचे दर्शन झाल्यावर माझी भावजागृती झाली. तिने मला जवळ घेऊन मिठीत घेतले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. थोड्या वेळाने ती जायला निघाली. तेव्हा मी तिला ‘हे शैलपुत्रीमाते, तुझे स्मरण सतत रहाण्यासाठी तुझे एक रूप मला माझ्या हृदयात ठेवायला दे’, अशी प्रार्थना केली. त्या वेळी तिने सिंहावर आरूढ असलेल्या दुर्गादेवीचे रूप माझ्या हृदयात विराजमान केले.
१ इ. ब्रह्मचारिणीदेवीचे दर्शन झाल्यावर साधिकेने ‘माझ्याकडून साधना करून घे’, अशी देवीला प्रार्थना करणे आणि देवीने ‘तुझ्याकडून साधना होईल’, असे सांगून पू. सौरभ जोशी यांना साधिकेला साधनेत साहाय्य करायला सांगणे : मी डोळे उघडले आणि पू. दादांना म्हणाले, ‘‘आता आपण ब्रह्मचारिणीदेवीचे दर्शन घेऊया का ?’’ तेव्हा पू. दादा मला म्हणाले, ‘‘हो, चल.’’ मी देवीला प्रार्थना केली, ‘हे ब्रह्मचारिणीमाते, आम्हाला तुझे दर्शन घडव.’ त्यानंतर मला शंख आणि घंटा यांचा आवाज ऐकू आला. मला सूक्ष्मातून एका हातात माळ आणि दुसर्या हातात कमंडलू घेतलेली ब्रह्मचारिणीदेवी दिसली. मी तिला धावत जाऊन मिठी मारली आणि ‘आई, तूच माझ्याकडून साधना करून घे’, अशी प्रार्थना केली. तेव्हा ती हसली आणि मला म्हणाली, ‘तुझ्याकडून साधना होईल. तू संघर्षाला घाबरू नकोस; कारण संघर्षातूनच तुझी साधना होणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे.’ नंतर ती पू. दादांकडे बघत त्यांना म्हणाली, ‘ही तुमची लहान बहीण आहे. तिला साधनेत साहाय्य करा.’ तिने माझ्या प्रार्थना ऐकल्या होत्या; म्हणून तिने तिचे लहान रूप माझ्या हृदयात विराजमान केले आणि ती अंतर्धान पावली.
२. प्रत्येक भाववृद्धी सत्संगात घडलेले देवीचे दर्शन !
दुसर्या दिवशीच्या भाववृद्धी सत्संगात मला ‘चित्रघंटादेवी’चे दर्शन झाले. नंतर प्रत्येक सत्संगात मला त्या त्या देवीचे दर्शन होऊ लागले. तेव्हा संतांचे सामर्थ्य माझ्या लक्षात आले आणि मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. मला ‘चित्रघंटा, कूष्मांडा, कात्यायनी आणि महागौरी या देवींचे दर्शन झाले. त्या लहान लहान रूपात माझ्या हृदयात विराजमान झाल्या.
२ अ. स्कंदमातेने दर्शन देऊन साधिकेला ‘सर्वांमध्ये प्रीती अनुभवल्यावर स्वभावदोष आणि अहं यांवर मात करणे सहज शक्य होईल’, असे सांगणे : मी स्कंदमातेचे दर्शन घेतले. तिने मला तिच्या मांडीवर बसवले आणि मला म्हणाली, ‘तू सर्वांमध्ये प्रीती अनुभवलीस, तर तुला तुझे स्वभावदोष आणि अहं यांवर मात करणे सहज शक्य होईल ! मी त्या भाववृद्धी सत्संगात सूक्ष्मातून तिच्या मांडीवर बसले होते.
२ आ. कालरात्रीदेवीने साधिकेला ‘त्रासाशी लढणे’, ही तुझी साधना असून मी तुझ्या पाठीशी आहे’, असे सांगणे : मला कालरात्रीदेवीचे दर्शन झाले. तिने माझ्यातील सर्व त्रासदायक शक्ती तिच्या मारक तत्त्वाने नष्ट केली. तेव्हा तिचे उग्र रूप शांत झाले. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला म्हणाली, ‘त्रासाशी लढणे’, हीच तुझी साधना आहे. तू सतत लढत रहा. मी तुझ्या पाठीशी आहे.’ कालरात्रीदेवी असे सांगत असतांना ‘ती तिची शक्ती मला प्रदान करत आहे’, असे मला वाटले.
२ इ. सूक्ष्मातून ‘महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती’ यांचे दर्शन होणे, त्यांना ‘तुमच्या खर्या रूपाचे दर्शन घडवा’, अशी प्रार्थना केल्यावर तिन्ही देवी हळूहळू एकरूप होऊन देवीचे एकच रूप दिसणे : २४.१०.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संगात महासरस्वती देवीची स्तुती करणारे एक भजन लावले होते. मी डोळे बंद करून ते भजन ऐकत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून ‘महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती’ माझ्यासमोर असून मी त्यांना साष्टांग दंडवत घालत आहे’, असे दिसले. मी त्यांना प्रार्थना केली, ‘मला तुमच्या खर्या रूपाचे दर्शन घडवा.’ मी वर बघितले, तर त्या तिन्ही देवी हळूहळू एकरूप झाल्या आणि देवीचे एकच रूप मला दिसले. तिचे अर्धे शरीर महासरस्वतीचे आणि अर्धे शरीर महालक्ष्मी अन् महाकाली यांचे होते.
२ ई. देवीची रूपे वेगवेगळी असली, तरी त्यांच्यातील तत्त्व एकच असल्याची निश्चिती होणे : प्रत्येक भाववृद्धी सत्संगात माझी भावजागृती होत होती आणि ‘मी देवीशी एकरूप होत आहे’, असे मला वाटत होते. मी डोळे बंद केल्यावर मला देवीचे दर्शन होत होते. त्या वेळी ‘देवीतत्त्व एकच आहे. केवळ तिची रूपे वेगवेगळी आहेत’, याची मला निश्चिती झाली.
प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे जगन्माते, माझे तन, मन, धन आणि बुद्धी गुरुचरणी समर्पित होऊ दे. ‘हे आई, मला गुरुकृपेला पात्र कर’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हे महादेवी, हे जगत्जननी, तूच तुझी विविध रूपे माझ्या हृदयमंदिरात विराजमान करून माझ्या हृदयाचे हृदयमंदिर केलेस, याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. मनुश्री साने (सध्याचे वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (२७.१०.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |