भौतिकशास्त्रासाठी ३ वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार जाहीर !

‘क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्स’वर केले संशोधन !

स्टॉकहोम (स्वीडन) – येथे ‘नोबेल प्राइज वीक २०२२’ चालू आहे. त्या निमित्ताने भौतिकशास्त्रात संशोधन करणार्‍या तीन वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यांमध्ये एलेन आस्पेक्ट, जॉन एफ्. क्लॉसर आणि एंटन जेलिंगर यांचा समावेश आहे. त्यांनी ‘क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्स’ आणि ‘फोटोन्स’ यांवर संशोधन केल्याने त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला.

१. एलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे असून ते पॅरिस आणि स्केले विद्यापिठांमध्ये प्राध्यापक आहेत. जॉन एफ्. क्लॉसर हे अमेरिकी संशोधक आणि प्राध्यापक आहेत, तर एंटन जेलिंगर हे ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापिठात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख असून संशोधक आहेत.

२. नोबेल प्राईज वीक १० ऑक्टोबरपर्यंत चालणार असून एकूण ६ पुरस्कार जाहीर होणार आहेत. ३ ऑक्टोबरला वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार स्वीडनचे सावन्ते पाबो यांना घोषित करण्यात आला.

३. डिसेंबरमध्ये हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. १० ऑक्टोबर या दिवशी अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येईल.

४. कोरोना काळामुळे वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये जाहीर झालेले पुरस्कार देता आले नव्हते. त्यांनाही स्टॉकहोममध्ये आमंत्रित करण्यात येणार आहे.

काय असते ‘क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्स’ ?

मुळात ‘क्वांटम थिअरी’ म्हणजे वस्तू अथवा प्रकाश यांच्या वर्तनाचा अणू आणि अवअणूकण (अणूच्या आतील कण) या स्तरांवर जाऊन केलेला अभ्यास. ‘क्वांटम मॅकॅनिक्स’ या शास्त्रामध्ये वस्तूंची अणू आणि अवअणूकण स्तरीय भौतिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यात येतात. या शास्त्राचा उपयोग करून माहितीचे विश्लेषण, त्यावर प्रक्रिया आणि ती प्रसृत करणे, यांचा अभ्यास ‘क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्स’च्या अंतर्गत करण्यात येतो.