भारतातून चीनला जाणार्‍या इराणच्या विमानात बाँब असल्याची माहिती

  • भारताने विमान उतरवण्यास अनुमती नाकारली

  • भारताच्या सुखोई लढाऊ विमानाने विमानाला साथ देत सीमेबाहेर सोडले

नवी देहली – इराणहून चीनच्या ग्वांगझूला येथे जाणार्‍या ‘महान एअरलाईन्स’च्या विमानात बाँब असल्याची धमकी मिळाल्यानंतर ते तात्काळ उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. इराणहून हे विमान पाकिस्तानच्या लाहोर येथे आल्यावर त्यात बाँब असल्याची माहिती मिळाली. यावर हे विमान भारताची राजधानी देहलीत उतरवण्याची अनुमती मागण्यात आली; मात्र भारताने तांत्रिक कारणामुळे ती नाकारली. यानंतर हे विमान चीनमध्ये गेले आणि काही घंट्यांनी तेथील विमानतळावर ते उतरले.

भारताच्या सीमेमध्ये हे विमान आल्यावर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारताची सुखोई ही लढाऊ विमाने तैनात करण्यात आली. या लढाऊ विमानांनी पंजाब आणि जोधपूर तळावरून उड्डाण केले. या विमानांनी इराणच्या विमानासमवेत उड्डाण करत त्याला भारताच्या सीमेतून बाहेर जाईपर्यंत साथ दिली. भारतातून ते म्यानमार मार्गे चीनला गेले. इराणच्या यंत्रणांनी मात्र विमानात बॉम्ब असल्याची शक्यता नाकारली आहे.