दळणवळण बंदीच्या काळात घरून आश्रमात आल्यानंतर वेगळ्या खोलीत रहात असतांना गुरुतत्त्वाची आलेली अनुभूती

कु. एकता नखाते

१. आश्रमात आल्यानंतर आईच्या आठवणीने रडू येणे

‘९.४.२०२१ या दिवशी मी घरून आश्रमात आले. त्या काळात पूर्ण दळणवळण बंदी होती. त्यामुळे मी वेगळ्या खोलीत रहात होते. त्या वेळी मला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत होता. त्रासाच्या तीव्रतेनुसार माझ्या मनाची स्थिती अस्थिर झाली होती. माझ्या मनात विचार पुष्कळ वाढल्याने मला झोप लागत नव्हती. तेव्हा मला माझ्या आईची आठवण येऊन रडू आले. याच स्थितीत मी देवाला प्रार्थना करत होते आणि देवाशी बोलत होते. देवाशी बोलत असतांना मला अश्रू अनावर झाले.

२. घरी असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आईच्या माध्यमातून काळजी घेत असल्याचे अंतर्मनाने सांगणे

त्या वेळी मला आतूनच असा आवाज आला, ‘घरी आईच्या माध्यमातून कोण तुझ्या समवेत होते ? कोण तुझ्यावर प्रेम करत होते ? कोण तुझी काळजी घ्यायचे ? ती तुझी गुरुमाऊली तुला कधी एकटे सोडेल का ? आश्रमात सर्वांची आई आहेच ना ?’, हे ऐकून माझा भाव दाटून आला आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.

३. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या मिठीत घेतले असून साधिकेनेही त्यांना घट्ट पकडलेले आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसणे

त्या वेळी मला असे दृश्य दिसले की, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला त्यांच्या मिठीत घेतले आहे आणि मीही लहान मुलीप्रमाणे त्यांना घट्ट बिलगले आहे.’ हा क्षण अनुभवतांना माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेने अश्रू वाहू लागले. माझे मन शांत झाले आणि कोणताही त्रास न होता मला थोड्याच वेळात शांत झोप लागली.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर मला चांगले वाटत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी मला त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती देऊन माझा एकटेपणा नष्ट केला. या भावस्थितीचा आनंद मला दिवसभर घेता आला.

४. भ्रमणभाषमध्ये ‘देवीने एका लहान मुलीला कवेत घेतले असल्याचे दृश्य दिसल्यावर चित्राच्या माध्यमातून कालच्या क्षणांचे अखंड स्मरण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ते चित्र पाठवले असल्याचे लक्षात येणे

देवीने लहान मुलीला कवेत घेतल्याचे कु. एकता नखाते यांनी भ्रमणभाषवर पाहिलेले चित्र

रात्री झोपण्यापूर्वी भ्रमणभाष पहात असतांना मला एक चित्र दिसले. त्यात देवीने एका लहान मुलीला कवेत घेतले होते. काल मला या चित्राप्रमाणेच दृश्य दिसले होते. ‘ही सर्व गुरुमाऊलींची लीला आहे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘या चित्राच्या माध्यमातून अखंड या क्षणांचे स्मरण रहावे; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्यासाठी ते चित्र पाठवले आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझे मन भरून आले. ‘गुरुदेव आपल्या मनातील प्रत्येक बारीक विचाराकडे लक्ष ठेवून आपल्याला आनंद देतात आणि आपल्यावर प्रेम करतात’, याची मला अनुभूती घेता आली.

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी ‘या चित्राकडे पाहून तुला शक्ती मिळेल’, असे सांगणे

वरील अनुभूती आणि चित्र श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना दाखवल्यावर त्यांना ते चित्र पुष्कळ आवडले. त्यांनी मला सांगितले, ‘‘या चित्राकडे पाहून तुला शक्ती मिळेल.’’ त्यांनी मला ही अनुभूती लिहून देण्यास आणि त्या समवेत चित्र देण्यास मला सांगितले.

‘सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरुमाऊली आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाआई, माझी कोणतीही पात्रता नसतांना तुम्ही मला तुमच्या समवेत ठेवले आहेत. तुम्ही माझ्यावर अखंड प्रेमाचा वर्षाव करत आहात, याची जाणीव माझ्या मनात सदैव टिकून राहून त्यात वृद्धी होऊ दे’, हीच आपल्या चरणी माझी कृतज्ञतारूपी प्रार्थना आहे.’

– कु. एकता नखाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१.८.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक