‘५.१०.२०१६ या दिवशी आश्विन शुक्ल चतुर्थी या तिथीपासून (नवरात्रीमध्ये) राष्ट्रीय स्तरावरील भक्तीसत्संगांना आरंभ झाला. तेव्हापासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भक्तीसत्संगांद्वारे साधकांना भाववृद्धीसाठी मार्गदर्शन करतात. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी लागू करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या भक्तीसत्संगातील बोलण्यात पुष्कळ पालट जाणवत आहे. भक्तीसत्संगात मार्गदर्शन करतांना त्यांच्या वाणीची जी विविध वैशिष्ट्ये लक्षात आली, त्याविषयीची त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधिका कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी पुढील सूत्रे पुढे दिली आहेत. त्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.
१. भक्तीसत्संगाच्या आरंभी मार्गदर्शन करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज अत्यंत शांत, स्थिर आणि एका लयीत असण्यामागील अध्यात्मशास्त्र
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या शिवात्मा-शिवदशा अनुभवत असल्यामुळे त्यांचे मन भगवंताच्या विश्वमनाशी एकरूप होऊन परमशांतीची अनुभूती अनुभवत असते. या अनुभूतीचा परिणाम त्यांच्या वाणीवर स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे जेव्हा त्या भक्तीसत्संगाच्या आरंभी मार्गदर्शन करतात, तेव्हा त्यांचा आवाज अत्यंत शांत, स्थिर आणि एका लयीत असतो.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भक्तीसत्संगात बोलतांना त्यांच्या वाणीतील गोडवा वाढण्यामागील अध्यात्मशास्त्र
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील समष्टी भावामुळे त्यांचे ईश्वराशी अखंड अनुसंधान चालू असते. त्यामुळे त्यांना सतत आत्मानुभूती येते. तेव्हा त्यांच्या सहस्रारातील सहस्रदलकमळातून ज्ञानरूपी अमृतरस पाझरून तो कंठापर्यंत येतो. या अमृतरसाचा स्पर्श त्यांच्या वाणीला झाल्यामुळे, त्यांची वाणी शुद्ध, सात्त्विक आणि ओजस्वी होते. आत्मज्ञानरूपी अमृतरसाचे माधुर्य त्यांच्या जिभेमध्ये मुरल्यामुळे त्यांच्या वाणीला दिव्यता लाभून ती देवांच्या वाणीप्रमाणे सुमधुर आणि कोमल होते.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भक्तीसत्संगात बोलतांना ‘त्यांचा आवाज एखाद्या लहान मुलीसारखा वाटतो’, या मागील अध्यात्मशास्त्र
‘दळणवळण बंदीच्या काळात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भक्तीसत्संगात बोलतांना त्यांच्या वाणीतील गोडवा वाढला आहे’, असे लक्षात आले. त्यानंतर हळूहळू त्यांच्या आवाजातील माधुर्य इतके वाढले की, ‘त्या सत्संगात बोलतांना त्यांचा आवाज एखाद्या लहान मुलीसारखा वाटतो.’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीतील माधुर्यामुळे ती गोड वाटते आणि तिच्यातील सुकोमल स्वरांमुळे अन् त्यांच्या अहंशून्य स्थितीमुळे मनात ईश्वराप्रती जागृत झालेल्या बालकभावामुळे ती लहान मुलीप्रमाणे निर्मळ आणि निरागस जाणवते.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलतांना त्यांच्या वरच्या पट्टीतील आवाजावर उपाय म्हणून त्यांनी पाणी पिणे, बोलायचे मध्येच थांबवणे, खोकला येणे; पण यांचा परिणाम न होण्यामागील अध्यात्मशास्त्र
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भाववृद्धी सत्संगात बोलतांना त्यांच्या आवाजाची पट्टी वरची होत जाते. अनेक वेळा त्यांच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण झाल्यामुळे त्यांना खोकला येतो. त्या वेळी त्या बोलणे थांबवतात किंवा पाणी पितात; पण नंतर त्यांनी पुन्हा बोलणे आरंभ केल्यावरही त्याच वरच्या पट्टीमध्ये आवाज येतो. साधारणपणे एखादी व्यक्ती बोलतांना आवाजाची पट्टी वाढली आणि ती बोलायची थांबली आणि नंतर पुन्हा ती व्यक्ती बोलू लागल्यास, तिचा आवाज पुन्हा नेहमीप्रमाणे होतो, म्हणजे खालच्या पट्टीला येतो; पण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात असे होत नाही. त्यांचा आवाज तसाच रहातो. कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे (पाणी पिणे, मध्ये थांबणे, खोकला येणे इत्यादींमुळे) त्यांच्या आवाजावर परिणाम होत नाही. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सद्गुरु असल्यामुळे त्यांची वाणी दिव्यतर आहे. त्यामुळे या वाणीमध्ये कार्यरत असणार्या दिव्य ईश्वरी चैतन्यामुळे त्यांच्यावर पाणी पिणे, मध्ये थांबणे, खोकला येणे इत्यादींमुळे काहीही परिणाम न होता ती तशीच चालू रहाते.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वाणी दिव्यतर आणि आनंदमय असल्यामुळे ‘ती वरच्या पट्टीतील असली, तरी ती ऐकतच रहावी’, असे वाटणे
एखादी व्यक्ती पुष्कळ वेळ वरच्या पट्टीत बोलू शकत नाही, तसेच एखादी व्यक्ती पुष्कळ वेळ वरच्या पट्टीत बोलत असेल, तर समोरच्या व्यक्तीलाही ते ऐकवत नाही; पण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलतांना तसे जाणवत नाही. त्यांचा आवाज वरच्या पट्टीत असला, तरी ऐकतच रहावासा वाटतो.
६. ईश्वराच्या समष्टी कार्याच्या अनुषंगाने श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे भक्तीसत्संगातील बोलणे कधी वरच्या, तर कधी खालच्या पट्टीत होणे
बर्याचदा असे लक्षात येते की, काही विषय किंवा सूत्रे सांगत असतांना त्यांचा आवाज वरच्या पट्टीला असतो, तर काही सूत्रे सांगत असतांना त्यांचा आवाज खालच्या पट्टीला असतो आणि बराच काळ तो तसाच रहातो.
६ अ. वरच्या आणि खालच्या पट्टीतील आवाजांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद
जेव्हा ईश्वराच्या समष्टी कार्यातील अडथळे दूर होणे आवश्यक असते, तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ वरच्या पट्टीत बोलतात. जेव्हा ईश्वराच्या समष्टी कार्याकडे अनेक जण आकृष्ट होऊन ईश्वराशी जोडले जाणे आवश्यक असते, तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ खालच्या पट्टीत बोलतात. अशा प्रकारे ईश्वराच्या समष्टी कार्याच्या अनुषंगाने श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे भक्तीसत्संगातील बोलणे कधी वरच्या, तर कधी खालच्या पट्टीत होते.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१८.९.२०२२)
|