‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने तळमळीने सेवा करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड !

भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. महेंद्र राठोड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ४९ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७५ वर्षे) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. शिवाजी वटकर

‘मी साधारण १५ वर्षांपासून श्री. महेंद्र राठोड यांना ओळखतो. देवद आश्रमात त्यांच्याशी माझा अधूनमधून संपर्क येतो. त्यांच्या बाह्य दिसण्यावरून आणि अबोल स्वभावामुळे ‘ते सेवा कशी काय करत असतील ?’, असे एखाद्याला वाटणे साहजिक आहे; पण ‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ।।’, या संत चोखा मेळा यांच्या अभंगाप्रमाणे महेंद्रदादा वरकरणी साधे वाटत असले, तरी त्यांच्यात साधकत्व आणि सेवाभावी वृत्ती आहे.

१. दादांचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि हसरा असतो.

२. साधी रहाणी

त्यांना खाणे-पिणे, कपडे, बाहेर फिरणे, विरंगुळा म्हणून काही छंद जोपासणे, अवांतर वाचन इत्यादी कशाचीच आवड नाही. त्यांच्याकडे १० वर्षांपूर्वीचा साधा भ्रमणभाष संच आहे. तो संच ते केवळ सेवेसाठी आणि आवश्यक बोलण्यासाठी वापरतात.

३. शिकण्याची वृत्ती

आरंभी दादांकडे ज्या सेवांचे दायित्व दिले होते, त्या सर्वच सेवा त्यांच्यासाठी पुष्कळ नवीन होत्या. तेव्हा त्यांनी त्या सर्व सेवा शिकून घेतल्या आणि त्यातील बारकावे आत्मसात केले. ते पूर्ण झालेल्या सेवेतून आणि त्यातील चुकांतून शिकतात अन् पुढील वेळी सेवा करतांना त्यात पालट करतात.

४. उत्तम निरीक्षणक्षमता

श्री. महेंद्र राठोड

दादा साधकांकडून सेवा करून घेतांना त्यांना योग्य दृष्टीकोन देतात. त्यांचे निरीक्षण चांगले आहे. साधकांनी प्रसाधनगृह स्वच्छता केल्यावर ते स्वतः त्याची पहाणी करतात आणि त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करतात.

५. सकारात्मकता आणि स्वीकारण्याची वृत्ती

दादांच्या पत्नीला आध्यात्मिक त्रास आहे. आरंभी पत्नीला समजून घेतांना त्यांच्या मनाचा संघर्ष होत असे. आता त्यांना वाटते, ‘यामुळे मला देवाची आठवण होत आहे.’ संतांनाही तीव्र त्रासाला सामोरे जावे लागले. संतांनी त्यांचे त्रास आनंदाने स्वीकारल्यामुळे ते देवाच्या चरणांपर्यंत पोचले, तसेच दादा पत्नीचा आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आता त्यांच्या पत्नीच्या त्रासाची तीव्रता आणि कालावधी उणावला आहे.

६. ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने आश्रम स्वच्छतेचे दायित्व पार पाडणे

समर्थ रामदासस्वामींचे शिष्य कल्याणस्वामी म्हणायचे, ‘‘हा माझ्या गुरूंचा आश्रम आहे आणि मला त्याची सेवा करायची आहे.’’ महेंद्रदादांना सेवा करतांना पाहून या वचनाची आठवण होते. याविषयी दादा मला म्हणाले, ‘‘देवद आश्रम स्वच्छ ठेवण्याचे दायित्व माझे आहे. ‘दिसेल ते कर्तव्य’ म्हणून मला जेवढे शक्य होईल तेवढी सेवा मी करणार आहे.’’

७. सेवेची तळमळ

दादांमध्ये सेवेची पुष्कळ तळमळ आहे. ‘दादांनी साधकांना त्यांची नियोजित दिलेली स्वच्छतेची सेवा अपेक्षित अशी झाली नाही किंवा अल्प झाली, तर ते अस्वस्थ होत नाहीत. ‘ती सेवा कशी पूर्ण करता येईल ?’, अशी त्यांची तळमळ असते.

८. भाव

८ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना स्थुलातून भेटण्यापेक्षा त्यांचे रूप असलेल्या साधकांची सेवा करण्यात आनंद मिळतो’, असे सांगणे : वर्ष २००७ मध्ये दादांचे लग्न झाले. तेव्हा ते रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटायला गेले होते. आता मी त्यांना विचारले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला जावेसे वाटते का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘देवद आश्रमातील साधक हेच माझ्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांचे रूप आहेत. साधकांची सेवा, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा आहे. त्यांच्या सेवेतून मला आनंद मिळतो. त्यामुळे ‘परात्पर गुरु डॉक्टरांना गोवा येथे जाऊन भेटावे’, असे मला वाटत नाही.’’ ‘गुरु म्हणजे गुरूंचा स्थूल देह नसून ते गुरुतत्त्व आहे आणि गुरुतत्त्वाची सेवा म्हणजे गुरूंची आनंददायी सेवा’, असा दादांचा सेवाभाव असतो.

आ. ‘स्वतःकडून आणि सहसाधकांकडून अधिकाधिक सेवा व्हावी’, अशी त्यांची तळमळ असते. त्यांना थोडासा वेळ मिळाला, तरी ते सेवा करतात. त्यांच्या मनात ‘मी आणखी काय सेवा करू ?’, असे सकारात्मक विचार असतात.

इ. दादांना कोणतीही सेवा सांगितली, तरी ती करण्याची आणि त्यासाठी कष्ट घेण्याची त्यांची सिद्धता असते. तेव्हा ते स्वतःचा विचार करत नाहीत, तसेच झोप किंवा तहान-भूक यांकडे पहात नाहीत. ‘दिलेली सेवा परिपूर्ण व्हायला पाहिजे’, असा त्यांचा विचार असतो.’

ई. कधी कधी साधक ‘मी सेवा करू शकत नाही’, अशी अडचण सांगतात. त्या वेळी दादांना प्रतिक्रिया येत नाहीत. तेव्हा ते ‘देवाने मला अडचण सोडवण्याची संधी दिली आहे आणि आलेली अडचण देवच सोडवणार आहे’, असा भाव ठेवतात. त्यामुळे त्यांना देवाचे साहाय्य मिळून ती अडचण सहजपणे सुटते.

उ. दादांची शरीरयष्टी किरकोळ आहे, तरीही त्यांना थकवा येत नाही. दुसर्‍या नियोजित साधकांची सेवा ऐनवेळी स्वतःला करावी लागली, तरी त्यांना प्रतिक्रिया येत नाही. त्यांना त्या सेवेतून आनंद मिळतो.

९. ‘महेंद्रदादांसारखा सनातनचा साधक, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेला चालता-बोलता ग्रंथच आहे’, असे वाटून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होणे : ‘दादा सेवा आणि साधना कशी करतात ?’, हे त्यांच्याकडून शिकून घेऊया’, असे मी माझ्याकडे आलेल्या साधकाला सुचवतो. तेव्हा ‘सनातनचा प्रत्येक साधक म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेला चालता-बोलता ग्रंथच आहे’, असे मला वाटते. ‘माझ्या समवेतचे साधक आणि संत म्हणजे सूक्ष्म रूपातील परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, याची मला सतत जाणीव होते अन् माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते.

११. जाणवलेले पालट

११ अ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढल्याचे जाणवणे : काही वर्षांपूर्वी दादांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न फार अल्प होते. आता दादा ‘व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांचे नियोजन करून प्रयत्न करतात. सेवा करतांना मध्येच १० – १५ मिनिटे वेळ मिळाला, तर ते ‘सारणीलिखाण करणे, स्वयंसूचना सत्र करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’ने त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, भावप्रयोग करणे’, अशा कृती करतात. ते उपलब्ध वेळेचा सदुपयोग करतात. ‘पूर्वीच्या तुलनेत त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले आहेत’, असे मला वाटते.

११ आ. अलीकडे ‘त्यांची सेवा आणि साधना करण्याची तळमळ अन् त्यांच्यातील परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भाव वाढत आहे’, मला जाणवते.

परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गानुसार साधना करणारे श्री. महेंद्रदादा हे ‘एक विरक्त; पण प्रसन्न अन् साधकत्व असलेले व्यक्तीमत्त्व आहे’, असे मला वाटते. ‘त्यांच्यासारखी तळमळ, चिकाटी, प्रांजळपणा, गुरूंप्रती भाव इत्यादी गुण आम्हा साधकांत येऊ देत’, अशी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.५.२०२२)