मंचकी निद्रेनंतर घटस्थापनेच्या दिवशी श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर प्रतिष्ठापित !

श्री तुळजाभवानीदेवीची मूळ सिंहासनावर करण्यात आलेली प्रतिष्ठापना

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २६ सप्टेंबर (वार्ता.) – घटस्थापनेच्या मध्यरात्री १ वाजता १७ सप्टेंबरपासून चालू झालेली श्री तुळजाभवानीदेवीची मंचकी निद्रा पूर्ण झाली. विधीवत् आणि परंपरागत पद्धतीने श्री तुळजाभवानीदेवीच्या भोपे पुजारी बांधवांनी देवीची मूर्ती पलंगावरून मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित केली. त्यानंतर पहाटे ४ वाजता मंदिर संस्थानचे पदाधिकारी आणि मानकरी महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

भर पावसातही श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेण्यासाठी आणि ज्योत घेऊन जाण्यासाठी भाविकांचा उत्साह कायम होता. महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात तुळजापूर येथे आले आहेत. भाविकांच्या संख्येच्या दृष्टीने पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिराच्या बाहेर निवार्‍याची सोय केलेली नाही. (भाविकांची सोय व्हावी यादृष्टीने प्रशासनाने संभाव्य अडचणी लक्षात घेऊन नियोजन करणे अपेक्षित असतांना सरकारीकरण झालेली मंदिरे कोणते सुयोग्य नियोजन करतात ? – संपादक)