अमरावती येथील आमदार संतोष बांगर आक्रमणप्रकरणी ११ शिवसैनिकांना अटक !

5अमरावती – २५ सप्टेंबर या दिवशी अंजनगाव सुर्जी येथे शिवसैनिकांच्या वतीने येथील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर आक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी अंजनगाव पोलिसांनी ११ शिवसैनिकांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता ३५३ सह विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे.

आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटात सामील होणारे आमदार आहेत. याचा राग शिवसैनिकांना आहे. बांगर हे कुटुंबासह दुपारी ३ वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनासाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनावर आक्रमण केले. या घटनेनंतर बांगर यांनी ‘माझ्यासमवेत पत्नी आणि मुलगी असल्यामुळे मी कोणताही प्रतिकार केला नाही. या दोघी नसत्या, तर शिवसैनिकांना प्रतिउत्तर दिले असते’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.