भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने…
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा २५.९.२०२२ या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी केलेले काव्य येथे देत आहोत.
१. साधकांना घडवणे
१ अ. ‘साधकांचा एक क्षणही वाया जाऊ नये’, असा विचार करणे : ‘मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या समवेत अनेक सेवा करण्याची संधी मिळाली. अनेक वेळा मला साधकांना त्यांच्याशी भ्रमणभाषवर साधनेविषयी बोलण्यासाठी जोडून देण्याची सेवा मिळाली. या सेवेतून त्यांनी मला पुष्कळ गोष्टी शिकवल्या. या वेळी ‘साधकांचा एकही क्षण वाया जाणार नाही’, असे त्यांचे नियोजन असते. अगदी त्या जेवतांनाही साधकांचा भ्रमणभाष आला, तरी त्या साधकांशी बोलतात.
१ आ. साधिकांना मानसिक स्तरावर नाही, तर आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आम्हा साधकांना घडवण्याची पुष्कळ तळमळ आहे. त्या कधीच आम्हाला मानसिक स्तरावर काही सांगत नाहीत. प्रत्येक प्रसंगात आध्यात्मिक स्तरावर राहून त्या आम्हाला साहाय्य करतात. काही वेळा त्या आमच्या चुकांची जाणीव करून देतात. तेव्हा आम्हाला आमच्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे रडू येते. तेव्हा त्या २ मिनिटे थांबून लगेचच पुढची सूत्रे सांगतात. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला वर्तमानात राहून पुढचे प्रयत्न करण्यासाठी साहाय्य केले आहे. एकदा त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही हिंदु राष्ट्रातील भावी नागरिक आहात ना ? मग तुमच्यामध्ये आत्मबळ पाहिजे. तुमचे मनोबल अधिक असायला हवे.’’
२. साधिकांना चूक सांगतांनाच त्यांना प्रेमाने खाऊही देणे
एकदा मी आणि एक सहसाधिका आम्हा दोघींकडून एक चूक झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आम्हाला ती चूक सांगत होत्या. त्या चूक सांगत असतांनाच एक साधिका त्यांच्यासाठी चहा आणि अल्पाहार घेऊन आली. तिने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यासाठी विदेशी साधकांसाठी बनवलेला ‘केक’ आणला होता. तेव्हा त्यांनी आम्हाला प्रेमाने ‘केक’चा एकेक तुकडा दिला आणि आम्हाला तो लगेच खायला सांगितला. त्यांनी ‘केक’ दिला, तेव्हा एका क्षणापूर्वी ‘त्या आम्हाला आमची चूक सांगत होत्या’, असे मला वाटलेही नाही. यातून ‘त्या सतत वर्तमानकाळात असतात’, हे लक्षात आले.
३. समष्टीविषयी तळमळ असणे
त्यांना एखादे सूत्र सांगितल्यावर त्या आम्हाला त्यातील प्रत्येक बारकावा समजावून सांगतात आणि ती कृती ‘आणखी चांगली कशी करायची’, हे शिकवतात. एखाद्या सूत्राचा विचार करतांना त्या केवळ रामनाथी आश्रमातील साधकांपुरताच मर्यादित विचार न करता अन्य आश्रम आणि सेवाकेंद्रातील साधकांचाही विचार करतात. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्या संदर्भात चौकटही द्यायला सांगतात. यातून त्यांची व्यापकता, दूरदृष्टी आणि समष्टीविषयीची तळमळ दिसून येते.’
– कु. मृण्मयी गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२२)
जगदंबास्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
तू दुर्गा तू भवानी ।
विश्वाची तू जननी ।
सारी माया तुझी आम्हा साधकांवरी ।
आहेस तू जगज्जननी ।। १ ।।
बैसे तू सिंहावरी
अंगावर शालू तुझ्या भरजरी ।
गोंधळ घालण्या आलो तुझ्या द्वारी ।
दे मज माते आशीर्वाद दे, मज अंबे आशीर्वाद ।
तुझ्या भावभक्तीचा झरा वाहू दे आमच्या मनोमनी ।। २ ।।
अवतरलीस तू या भूवैकुंठात ।
श्रीविष्णुप्रती सदा भाव तुझ्या ठायी ठायी ।
श्रीविष्णूचे स्थान असे तुझ्या हृदयसिंहासनी ।
आहेस तू या भूवैकुंठाची उत्तराधिकारी ।। ३ ।।
या वैकुंठात सांभाळ करी तू आम्हा लेकरांचा ।
तुझ्या चरणांवर ताण नाहीसा होई ।
तुझ्या वाणीतून प्रकटे भावगंगा भावसत्संगाची ।
उधळण होई आम्हा साधकांवर नवचैतन्याची ।। ४ ।।
महर्षींनी संबोधले तुला ‘भूदेवी’ ।
संकल्प श्रीविष्णूचा तुझ्या प्रेरणेने गुढी उभारू हिंदु राष्ट्राची ।
चरणी ठेवितो माथा, उधळण करतो भंडार्याची ।
नमन करितो माते, तुझ्या चरणी ओटी समर्पणाची ।। ५ ।।
– श्री. संकेत भोवर (वय २७ वर्षे), रामनाथी आश्रम, फोंडा, गोवा. (२५.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |