साधनेच्या आंतरिक तळमळीमुळे साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेले प्रश्नरूपी आत्मनिवेदन ! 

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !    

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘हे गुरुदेव, सनातन संस्थेचे कार्य आणि व्याप्ती पहाता ‘हे कार्य ईश्वरी अधिष्ठानाविना शक्य नाही’, हे बुद्धीला पटते; पण तरीही ईश्वरप्राप्तीची ओढ माझ्या अंतर्मनात का रुजत  नाही ?

२. हे गुरुदेव, तुम्हीच सर्वस्व आणि सर्वज्ञ आहात. तुम्हाला पाहिल्यावर ‘स्व’चेही विस्मरण होते. मग मला तुमच्यातील ईश्वराला पहाण्याची अनुभूती का घेता येत नाही ? माझ्यातील अहं आणि स्वभावदोष ईश्वरप्राप्तीच्या ध्येयात अडथळे का निर्माण करतात ?

सौ. स्नेहा शिंदे

३. हे गुरुदेव, ‘ईश्वर सर्वत्र आहे आणि तोच आमचे पालनपोषण करत आहे’, याची जाणीव तुम्हीच माझ्यात रुजवलीत. मग मी ईश्वराशी एकरूप होण्यात न्यून का पडते ?

४. हे गुरुदेव, ‘सभोवती असणारी सर्व माया नश्वर आहे’, हे तुमच्यामुळेच लक्षात आले, तरीही सभोवती असणार्‍या वस्तू अन् व्यक्ती यांचा मोह का होतो ? मला लोभ आणि मत्सर यांमध्ये अडकायला का होते ?

५. हे गुरुदेव, तुम्ही ‘सकारात्मकतेत ईश्वराचा वास आहे’, असे शिकवले, तरी मन नकारात्मकतेत जातांना मी त्याला सकारात्मकतेकडे वळवण्यास न्यून का पडते ?

६. हे गुरुदेव, मन पूर्णतः निर्मळ होऊन मी सर्वांना समभावाने पहाण्यास न्यून का पडते ? तुम्ही दिलेल्या समष्टी साधनेशी एकरूप होतांना कराव्या लागणार्‍या संघर्षाला धैर्याने सामोरे जाण्यास मी न्यून का पडते ?

‘हे गुरुदेव, तुमच्यातील ईश्वराशी एकरूप होण्याची ही व्याकुळता तुमच्या कृपाशीर्वादानेच शांत होईल. ‘कृपया या जिवावर कृपा करून आपल्या चरणांची धूळ होण्यास पात्र करा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. स्नेहा योगेश शिंदे, फोंडा, गोवा. (२४.७.२०१९)