रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सेवेच्या कक्षाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ज्या कक्षामध्ये सेवा करतात, त्या कक्षाचे नूतनीकरण झाल्यानंतर साहित्य ठेवण्यापूर्वी (८.१०.२०२१ या दिवशी) आणि साहित्य ठेवल्यानंतर (९.१०.२०२१ या दिवशी) काढलेली छायाचित्रे पाहून पुढील सूत्रे लक्षात आली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
साहित्य ठेवण्यापूर्वीचा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा कक्ष
साहित्य ठेवल्यानंतरचा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा कक्ष

टीप – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सेवेच्या कक्षात साहित्य ठेवण्यापूर्वी तेथे असलेल्या पोकळीमध्ये ब्रह्मांडपोकळीचे तत्त्व आकृष्ट झाले होते. त्यामुळे त्यांची खोलीत रिकामी दिसत असतांनाही परिपूर्ण वाटत होती.

निष्कर्ष

खोली रिकामी असतांना तिच्यामध्ये पोकळीचे प्रमाण अधिक असल्यामुळे रिकाम्या खोलीत प्रामुख्याने आकाशतत्त्व कार्यरत असते. याउलट खोलीत विविध वस्तू ठेवल्यामुळे तिच्यामध्ये पृथ्वी, आप आणि तेज या तत्त्वांचे प्राबल्य वाढते. त्यामुळे खोलीतील पोकळी न्यून होऊन तेथे पृथ्वी, आप आणि तेज ही तत्त्वे कार्यरत होतात. संतांच्या वस्तूंमध्ये चैतन्य असल्यामुळे त्यांच्या वस्तू सामान्य व्यक्तीच्या वस्तूंच्या तुलनेत अधिक तेजस्वी असतात. त्यामुळे संतांच्या खोलीत साहित्य ठेवल्यामुळे त्यांच्या खोलीमध्ये पृथ्वी आणि आप या तत्त्वांपेक्षा तेजतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. देहधारी संत अधिक प्रमाणात सगुण स्तरावर कार्य करत असल्यामुळे त्यांच्या खोलीत आवश्यक असणारे साहित्य असते. जेव्हा संत देहत्याग करतात, तेव्हा त्यांचे कार्य निर्गुण स्तरावर, म्हणजे आकाशतत्त्वाच्या स्तरावर चालू होते. यावरून आपल्या लक्षात येते की, संत पंचतत्त्वांच्या स्तरावर कार्यानुरूप साहित्य न्यूनाधिक करतात किंवा सेवेच्या ठिकाणामध्ये आवश्यक ते पालट करतात. त्याचप्रमाणे संतांच्या खोलीमध्ये आवश्यकतेनुसार सगुण-निर्गुण ईश्वरी तत्त्व अन् संबंधित देवतांचे तत्त्व आणि सूक्ष्म लोक यांचे वायुमंडल कशा प्रकारे निर्माण होते’, ही सूत्रे येथे शिकायला मिळाली.

कृतज्ञता

‘श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सेवेच्या खोलीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये लक्षात आली’, यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक