१२ राज्यांत एन्.आय.ए. आणि ईडी यांच्याकडून पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी : १०६ जणांना अटक

राष्ट्रीय अध्यक्ष ओमा सालेम याच्यासह अनेक पदाधिकार्‍यांना अटक

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी देशभरातील १२ राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) ठिकाणांवर धाडी घालून १०६ जणांना अटक केली. देहली, बिहार, बंगाल, आसाम, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आदी राज्यांत या धाडी घालण्यात आल्या. यामध्ये पी.एफ्.आय.चा अध्यक्ष ओमा सालेम याच्या केरळमधील ठिकाणांवरही धाडी टाकण्यात आल्या. सालेम याच्यासह पी.एफ्.आय.चा केरळ राज्याचा प्रमुख महमंद बशीर, राष्ट्रीय सचिव व्ही.पी. नजरुद्दीन आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पी. कोया यांना अटक करण्यात आली आहे. पी.एफ्.आय.च्या राज्य आणि जिल्हा स्तरांवरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली आहे. महाराष्ट्रात २० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. मध्यप्रदेशात इंदूरमध्ये पी.एफ्.आय.च्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या, तर उज्जैनमधून ४ जणांना अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिहादी आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या.

१. एन्.आय.ए.ची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे, ज्याअंतर्गत पी.एफ्.आय.च्या अनेक ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. आतंकवादाला निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी कट्टरपंथीय बनवणे यात गुंतलेल्या व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकून अन्वेषण यंत्रणांकडून शोध घेण्यात येत आहे.

२. तेलंगाणामधील भाग्यनगर आणि चंद्रयानगुट्टा येथील, तसेच तमिळनाडूतील पी.एफ्.आय.ची कार्यालये सील करण्यात आली. तमिळनाडूत या कारवाईच्या विरोधात पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी विरोध चालू केला आहे.

कोणत्या राज्यात किती ठिकाणी धाडी ?

उत्तरप्रदेश – ८
बिहार – २
आसाम – ५
देहली – ३
राजस्थान – २
मध्यप्रदेश-४
महाराष्ट्र- २०
कर्नाटक – २०
आंध्रप्रदेश – २०
पुड्डुचेरी – ३
तमिळनाडू – १०
केरळ – २२

संपादकीय भूमिका

केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी उशिरा का होईना; पण जिहादी संघटना पी.एफ्.आय.च्या विरोधात कारवाई चालू केली, हे स्वागतार्ह आहे. आता केंद्र सरकारने यापुढे जाऊन या संघटनेवर बंदी घालून त्यांची पाळेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !