अंमली पदार्थ व्यवहाराच्या प्रकरणी अन्वेषणासाठी भाग्यनगरचे पोलीस गोव्यात

पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – पोलीस अधीक्षक पदावरील अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालील भाग्यनगर पोलिसांचा एक गट अंमली पदार्थ व्यवसायावरून अन्वेषणासाठी १९ सप्टेंबर या दिवशी गोव्यात आला आहे. यामुळे गोव्यातील अंमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हणजुणे येथील कुप्रसिद्ध कर्लिस उपाहारगृहाचे मालक एडवीन न्युनीस यांनी भाग्यनगर येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केला आहे.

 (सौजन्य : Herald TV)

भाग्यनगर अंमली पदार्थविरोधी विभागाने यापूर्वी गोव्यातील अंमली पदार्थ व्यावसायिक प्रीतेश बोरकर याला एक मासापूर्वी कह्यात घेतले आहे. गोव्यातील अंमली पदार्थ व्यावसायिकांचा एक गट भाग्यनगर येथे अंमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याचे तेथील अंमली पदार्थविरोधी विभागाने केलेल्या अन्वेषणात उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाग्यनगर पोलीस गोव्यात हणजुणे येथील कर्लिस उपाहारगृहाचे मालक एडवीन न्युनीस यांच्यासह सुमारे १० अंमली पदार्थ व्यावसायिकांचे अन्वेषण करणार असून आणि यामधील प्रीतेश बोरकर, नरेंद्र फरहान आणि अहमद अन्सारी यांना पोलिसांनी यापूर्वीच कह्यात घेतले आहे. नरेंद्र फरहान याला कह्यात घेणे हे भाग्यनगर पोलिसांना मोठे आव्हान होते. नरेंद्र फरहान हा त्याच्या घरातूनच अंमली पदार्थाचा व्यवसाय करत होता आणि त्याने स्वत:च्या संरक्षणासाठी कित्येक कुत्रे पाळले होते.

सोनाली फोगाट यांच्या हत्येनंतर हणजुणे पोलिसांच्या कारवाईला वेग

पणजी – सोनाली फोगाट यांच्या हत्येनंतर खडबडून जागे झालेल्या हणजुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी कारवाईला वेग आला आहे. विशेष म्हणजे सोनाली फोगाट यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिसांना आवश्यक सूचना केल्या. यानंतर हणजुणे पोलिसांनी या वर्षात गेल्या ८ मासांत जेवढ्या कारवाया केल्या, त्याच्या दुप्पट कारवाया मागील केवळ १५ दिवसांत केल्या आहेत. (याचाच अर्थ हे आधीही शक्य असतांना केले नाही, यालाच निष्क्रीयता म्हणतात ! – संपादक) हणजुणे पोलिसांनी जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करून अंदाजे २ कोटी ७० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ कह्यात घेतले, तसेच या प्रकरणी १४ गुन्हे नोंद करून १९ संशयितांना कह्यात घेतले आहे.