सिकंदराबाद येथे अमित शहा यांच्या सुरक्षेत चूक !

  • तेलंगाणा राष्ट्र समितीच्या नेत्याने चारचाकी गृहमंत्र्यांच्या ताफ्याच्या आडवी लावली !

  • अनावधानाने चूक झाल्याचे स्पष्टीकरण !

भाग्यनगर (तेलंगाणा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या ७५ व्या ‘हैदराबाद मुक्ती दिना’च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेलंगाणा राज्याच्या दौर्‍यावर आहेत. १७ सप्टेंबर या दिवशी त्यांचा ताफा सिकंदराबाद सैनिकी मैदानाजवळ असतांना त्यांच्या सुरक्षेत चूक झाली. त्यांच्या ताफ्यापुढे सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीच्या गोसुला श्रीनिवास नावाच्या नेत्याने त्याची चारचाकी आडवी लावली. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात सुरक्षारक्षकांनी ती त्वरित मार्गातून दूर केली.

गोसुला श्रीनिवास यांनी हा प्रकार अनावधानाने घडल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, शहा यांच्या ताफ्यापुढे माझी चारचाकी अचानक थांबली. ही गोष्ट माझ्या लक्षात येईपर्यंत गृहमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी चारचाकीची तोडफोड केली. मी या प्रकरणी लवकरच पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करीन.’

१३ दिवसांतील सुरक्षेची दुसरी चूक !

अमित शहा यांच्या सुरक्षेत गत १३ दिवसांतील ही दुसरी चूक आहे. यापूर्वी ४-५ सप्टेंबर या दिवशी ते मुंबईच्या दौर्‍यावर असतांना एक संशयित त्यांच्या जवळपास संशयास्पदरित्या फिरतांना आढळला होता. अधिकार्‍यांना त्याचा संशय आला असता त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्या व्यक्तीला अवघ्या २-३ तासांतच अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

सुरक्षाव्यवस्था करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होणे आवश्यक !