याकूब मेमनच्या कबरीविषयी वाद; परंतु औरंगजेब आणि अफझलखान यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाचा प्रश्‍न प्रलंबितच !

मुंबई – मुंबई बाँबस्फोटातील प्रमुख गुन्हेगार याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणामुळे वाद निर्माण झाला; मात्र छत्रपती शिवरायांच्या काळात महाराष्ट्रावर आक्रमण करणारे औरंगजेब आणि अफझलखान या अतिरेक्यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे. अफझलखानाच्या कबरींचे उदात्तीकरण अद्यापही चालू आहे. याकूब मेमन याच्या कबरीच्या उदात्तीकरणाचे वृत्त प्रसिद्ध होताच गृहमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे; परंतु औरंगजेब आणि अफझलखान या अतिरेक्यांच्या कबरींविषयी राज्य सरकारने अद्यापही ठोस भूमिका घेतलेली नाही.

१. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेली अफझलखानाची कबर केवळ साडेसहा फुटांच्या जागेत आहे; परंतु त्यानंतर कबरीच्या बाजूला अनुमाने १५ सहस्र फुटांच्या जागेवर अवैध बांधकाम करण्यात आले आहे.

२. याविषयी निर्माण झालेल्या वादानंतर वर्ष २००५ पासून या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. येथील अवैध बांधकाम तोडून टाकण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने वर्ष २००८ मध्ये स्पष्ट आदेश दिले; परंतु या आदेशाला तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले.

३. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, तरीही आघाडी सरकारने अवैध बांधकाम तोडण्याऐवजी कबरीची डागडुजी केली.

४. वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा कडक शब्दांत अवैध बांधकाम तोडण्यास सांगितले; परंतु कबरीच्या ट्रस्टींनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवरून सध्या सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. याविषयी राज्यशासनाने पुन्हा चांगल्या अधिवक्त्यांची नियुक्ती करून ही स्थगिती उठवण्याची मागणी काही दिवसांपूर्वी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. याविषयी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

औरंगजेबाच्या कबरीचेही उदात्तीकरण चालूच !

महाराष्ट्रावर आक्रमण करणारा मोगल बादशहा औरंगजेब याची कबर संभाजीनगर येथे आहे. काही मासांपूर्वी तेलंगाणा येथील एम्.आय्.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि संभाजीनगर येथील खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. सुफी संत असल्याप्रमाणे महाराष्ट्राला लुटण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीचे उदत्तीकरण अद्यापही चालू आहे. याविषयीही सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

प्रवेशबंदी उठवून तेथे शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास सांगावा ! – नितीन शिंदे, सदस्य, गड किल्ले दक्षता समिती, भाजप

नितीन शिंदे

याकूब मेमन जसा अतिरेकी होता, त्याप्रमाणे अफझलखान आणि औरंगजेब हेही स्वराज्यावर आक्रमण करणारे अतिरेकीच होते. ही शिवप्रताप भूमी आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे भव्य शिल्प उभारावे, तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास सांगावा. या ठिकाणी कुणीही नमाजपठण करून या जागेचे उदात्तीकरण करू नये, तसेच भविष्यात या ठिकाणी दर्गा उभारला जाऊ नये. शिवप्रतापाची ही जागा मुक्त करावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना निवेदन दिले आहे. यावर मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांनी सचिवांना तातडीने बैठक घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तातडीने कार्यवाही करावी.