हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचाच हा दुष्परिणाम !
कोल्हापूर – भाविकांना सशुल्क दर्शन आकारल्याने देवीच्या भक्तांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे दोन गट पडतील. त्यामुळे नवरात्रोत्सवात असलेल्या मंगलमय वातावरणात अडथळा निर्माण होईल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून देवस्थान समिती ऐन नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन विकणार आहे का ? या निर्णयामुळे पावित्र्य भंग होणार असल्याने श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी शुल्क आकारणीवरून हिंदु युवा प्रतिष्ठानचा विरोध आहे, असे ‘हिंदु युवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. अशोक देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.
श्री. अशोक देसाई पुढे म्हणाले…
१. कोरोना महामारीच्या काळातही देवस्थान समितीने ‘ई-पास’ प्रणाली राबवली होती. त्या वेळी जरी हा पास नि:शुल्क असला, तरी काही लोकांनी त्याचा अपलाभ उठवत भाविकांडून ५० ते ५०० रुपयांची आकारणी केली होती. त्यामुळे याही वेळी असा प्रकार होणार नाही याची शाश्वती कोण देणार ?
२. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या लाखात असते आणि ही रांग छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रारंभ होते. भाविकांना दर्शन घेण्यासाठी किमान २ ते ३ घंटे उभे रहावे लागते. त्यामुळे सशुल्क दर्शनाची सोय केल्यास येथेही काही लोकांकडून अपलाभ उठवला जाऊ शकतो.
३. देवस्थान समिती अगोदरच भाविकांना स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी अशा सुविधा देत नाही आणि दुसरीकडे वादग्रस्त योजना लादण्याचा प्रयत्न करते.
४. इतर देवस्थानांप्रमाणे भाविकांच्या लूटमारीचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. या प्रकारास हिंदु युवा प्रतिष्ठान तीव्र विरोध करील.