सातारा, १४ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा येथील राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तीमत्त्व अशी ओळख असणारे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथे उपचार चालू असतांना १३ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.
आमचा आधार हरपला ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
आमचे सख्खे काका गेल्यामुळे आमची आणि राजघराण्याची अपरिमित हानी झाली आहे, तसेच माझ्या वडिलांच्या जागी असलेल्या काकांचा भरभक्कम आधार हरपला आहे. कालाय तस्मै नम: ।
आमच्या कुटुंबावर आघात ! – श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले
काका एक आदर्श व्यक्तीमत्त्व होते. पालिकेच्या राजकारणात त्यांनी आदर्श निर्माण केला होता. ते आमचे चांगले मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो.