श्राद्धकर्त्याच्या ७ गोत्रांतील गती मिळणारी १०१ कुळे

पितृपक्ष विशेष

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींच्या कह्यात जाऊन त्यांचे गुलाम झाल्याने अनिष्ट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धविधीमुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते. या पार्श्वभूमीवर सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. कालच्या अंकात श्राद्धाच्या आवश्यकतेविषयी आपण पाहिले. आज श्राद्ध केल्याने कुणाला गती मिळते, हे पाहूया. यातून श्राद्धाचे महत्त्व अधोरेखित होण्याखेरीज रहाणार नाही.

माता पिता च भार्या च भगिनी दुहिता तथा ।
पितृमातृष्वसा चैव सप्त गोत्राणि वै विदुः ॥

अर्थ : आई, वडील, पत्नी, बहीण, कन्या, आत्या आणि मावशी ही सात गोत्रे आहेत. (या ७ गोत्रांतील १०१ कुळांना श्राद्ध केल्याने गती मिळते.)

कोणत्या गोत्रातील किती कुळांना गती मिळते, हे शेजारील सारणीत दिले आहे.

श्राद्धामुळे जरी १०१ कुळांना गती मिळत असली, तरी श्राद्धातील फल १०१ कुळांपैकी वडिलांच्या पूर्वीचे ११ आणि पुढचे १२ या कुळांना वाटून मिळते.

एकूणच यातून श्राद्ध केल्याच्या लाभांची अद्वितीय व्याप्ती लक्षात येते. त्यामुळे हिंदूंनी धर्मशास्त्रावर श्रद्धा बाळगून श्राद्ध करावे, तसेच साधना करून आनंदी जीवन जगावे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)