आमदार रवि राणा यांचा आरोप
अमरावती – मी पोलिसांचा नेहमी आदर आणि सन्मान केला. हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबासाठी मी केंद्र सरकारकडून सुविधा मिळवून दिल्या. सैनिक सीमेवर हुतात्मा होतात. मी त्यांना माझे वेतन दिले आहे. हुतात्मे आणि पोलीस यांच्यासाठी मी नेहमी रक्तदानाचे आयोजन करतो. त्यामुळे पोलिसांचा अवमान करणे, हे आमच्या रक्तात नाही. येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील बेपत्ता मुलीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केला आहे, असा आरोप येथील आमदार रवी राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला.
२ दिवसांपूर्वी येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हिंदु तरुणी सातारा येथे पोलिसांना सापडली होती. त्यानंतर ‘खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात पोलिसांशी वाद घालून त्यांचा अवमान केला आहे’, अशी टीका काही जणांनी सामाजिक माध्यमांवर केली होती. याविषयी ते म्हणाले, ‘‘अमरावती पोलिसांकडे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील पीडित कुटुंब पुष्कळ वेळा गेले; मात्र पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी पकडलेल्या आरोपीचा खुलासा का केला नाही ? जेव्हा ती मुलगी बेपत्ता होती, तेव्हा हे लोक पुढे का आले नाहीत ?’’
गुन्हे नोंद करण्याची सुपारी !
रवि राणा म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मी शेतकर्यांसाठी आंदोलन केले. त्या आंदोलनात मला दिवाळीच्या ३ दिवस आधी अटक करण्यात आली होती. शाईफेक प्रकरणी माझ्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते. खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हे नोंद केले होते. जेव्हा जेव्हा मी जनहिताचे प्रश्न मांडले, तेव्हा तेव्हा पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी नेत्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर गुन्हे नोंद केले. गुन्हे नोंद करण्याची पूर्ण सुपारी आरती सिंह यांनी घेतली होती.
अमरावती येथे वसुली पथक चालू केले !
पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी अमरावती येथे वसुली पथक चालू केले आहे. जेव्हापासून आरती सिंह येथे आल्या, तेव्हापासून प्रतिदिन ३-४ हत्या होतात. उमेश कोल्हे हत्या प्रकरणही दाबण्याचा प्रयत्न आरती सिंह यांनी केला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) त्या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे.