|
मुंबई – महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये पशूंमध्ये लंपी त्वचारोगाचा संसर्ग वाढत आहे. या आजारामुळे गोवर्गीय प्रजातींमधील २९ बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
१. गोवंशीय प्रजातींची सर्व गुरे आणि म्हशी यांना जेथे ठेवले जाते, त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
२. गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे आणि म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवार्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणत्याही भागात नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस अधिसूचनेनुसारही प्रतिबंध करण्यात आला आहे.
३. गोजातीय प्रजातींच्या गुरांचा किंवा म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे हेही टाळण्यास सांगितले आहे.
४. गुरे आणि म्हशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, अंदमान-निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगाणा आणि बंगाल या राज्यांमध्ये पसरला आहे.
५. लंपी रोगाची लागण झाल्यावर गायींची दूध देण्याची क्षमता न्यून होते, तर काही ठिकाणी दुधाचा पुरवठा पूर्णच बंद होतो.
लंपी त्वचारोग काय आहे ?लंपी त्वचारोग डास, माशा आदींद्वारे पसरतो. पशूंच्या संपर्कात आल्यावर किंवा दूषित भोजन आणि पाणी यांद्वारेही तो पसरतो. या रोगामुळे पशूंना ताप येणे, शरिरावर फोड येणे, दूध अल्प देणे आदी लक्षणे आढळून येतात. |