जालना – येथील मंठा अर्बन को-ऑप. बँकेत १२ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादण्यात आलेल्या मंठा अर्बन बँकेच्या विशेष लेखापरीक्षण अहवालात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२१ या काळात नियमबाह्य पद्धतीने व्यवहार आणि कर्जवाटप केल्याचा अहवाल विशेष लेखा परीक्षकांकडून देण्यात आला आहे. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर यांसह १४ जणांवर मंठा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी लेखा परीक्षकांना संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याविषयी अनुमतीही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या शिफारसीने लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेकडून या बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते.