२ वर्षांनंतर लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्स भागातून चीन आणि भारत यांचे सैन्य जात आहे माघारी !

बीजिंग (चीन) – लडाखमध्ये गेल्या २ वर्षांपासून भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये तणाव होता. चीनने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर त्याचे सैन्य तैनात केल्याने भारतानेही त्याला प्रत्युत्तर म्हणून सैन्य तैनात केले होते. या काळात दोन्ही सैन्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी स्तरांवर बैठका चालू होत्या. १६ व्या बैठकीनंतर चीनने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून सैन्य मागे घेण्यास संमती दिल्यावर येथील पेट्रोल पॉईंट-१५ (गोगरा-हॉटस्प्रिंग्स) येथून त्याचे सैनिक मागे घेण्यास प्रारंभ केला आहे. भारतानेही त्याचे सैन्य मागे घेण्यास चालू केले आहे. चीनने म्हटले, ‘सैन्याला माघारी बोलावणे भारत आणि चीन सीमेवरील शांतीसाठी अनुकूल आहे.’

शांघाय शिखर परिषद पुढील मासामध्ये उझबेकीस्तानमध्ये होणार आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार आहेत. येथे या दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच सैन्य माघारी घेतले जात आहे.

संपादकीय भूमिका

चीन भारताच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असला, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याने भारताने सतर्क रहाण्याचीच आवश्यकता आहे !