प्रेमळ आणि रुग्णसेवा भावपूर्ण करणार्‍या पुणे येथील आधुनिक वैद्या ज्योती काळे !

‘गेल्या १५ वर्षांपासून आधुनिक वैद्या ज्योती काळे पुणे येथील ‘श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि सार्वजनिक रुग्णालय’ येथे प्राध्यापक, भूलतज्ञ आणि वरिष्ठ सल्लागार (‘सिनियर कन्सल्टंट’) या पदांवर कार्यरत आहेत. माझा त्यांच्याशी सेवेच्या निमित्ताने संपर्क येतो. त्या वेळी माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.


आधुनिक वैद्या ज्योती काळे

१. प्रेमभाव

साधक काही वेळा शस्त्रकर्म करून घेण्यासाठी नवले रुग्णालयात भरती होतात. तेव्हा साधकांनी ज्योतीताईंना कधीही वैद्यकीय समादेश (सल्ला) विचारल्यास त्या तत्परतेने प्रतिसाद देतात.

सौ. मनीषा पाठक

२. रुग्णांची सेवा सवलत न घेता साधना म्हणून करणे

कोरोना महामारीच्या कालावधीतही ज्योतीताई नियमितपणे रुग्णालयात जात असत. त्या वैद्यकीय अधिकारी असल्याने त्या कालावधीत त्यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही. त्या वेळी ज्योतीताईंचा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझी काळजी घेणार आहेत. मला रुग्णांची सेवा साधना म्हणून भावपूर्ण करायची आहे’, असा भाव असायचा. त्यांनी कधीही कर्तव्य करण्यात किंवा सेवेत सवलत घेतली नाही.

३. नामजपादी उपाय गांभीर्याने करणे

कोरोनाच्या संपूर्ण कालावधीत त्यांनी नियमितपणे नामजपादी उपाय केले. त्यामुळे ताई कार्यरत असलेल्या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण अधिक असूनही त्यांना आरोग्याच्या संदर्भात कुठलीही अडचण आली नाही.

४. अल्प अहं

ज्योतीताई उच्चशिक्षित आहेत आणि त्या रुग्णालयात चांगल्या पदावर आहेत. समाजात त्यांना मानसन्मान आहे, तरीही यांपैकी कुठल्याही गोष्टीचा त्यांच्या बोलण्यात उल्लेख नसतो. मी पुष्कळ वेळा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात भरती असतांना माझ्या लक्षात आले, ‘ज्योतीताई साधकांशी जशा नम्रतेने बोलतात, तशाच प्रकारे त्या अन्य रुग्णांशीही बोलतात. त्यांच्या देहबोलीतून अहंभाव जाणवत नाही. त्या सर्वांशी समभावाने वागतात.’

५. संतसेवा भावपूर्ण करणे

सनातनच्या ५८ व्या संत पू. विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८७ वर्षे) या ज्योतीताईंच्या आई आहेत. कधी पू. आजींना वयोमानानुसार बरे नसेल, तर ज्योतीताई त्या प्रसंगाला धिराने सामोर्‍या जातात. त्या पू. आजींची सेवा भावपूर्णपणे करतात.

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉॅ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर कठीण प्रसंगांना सामोरे जाणे

ज्योतीताईंच्या जीवनात अनेक वेळा कठीण प्रसंग आले. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असणार्‍या श्रद्धेच्या बळावर त्या प्रत्येक प्रसंगाला सकारात्मक आणि स्थिर राहून सामोरे गेल्या. साधकांच्या संपर्कात रहाणे, वेळोवेळी मनमोकळेपणाने बोलून साधनेविषयी मार्गदर्शन घेणे, प्रांजळपणे मनाची स्थिती सांगणे इत्यादी प्रयत्न करून ज्योतीताई प्रत्येक परिस्थितीला धिराने सामोरे जातात.

७. कृतज्ञता

मला ज्योतीताईंच्या सहवासात त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली. त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– गुरुचरणी शरणागत, सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे (२४.८.२०२२)