‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. या आढाव्याला बसण्याची संधी श्री गुरुकृपेने मला मिळाली.
१. ‘सौ. सुप्रिया माथूर यांच्या माध्यमातून गुरुदेव साधकांना पुढच्या टप्प्यात नेत आहेत’, असे जाणवणे
सौ. सुप्रियाताई सरस्वतीमाता आहे आणि तिच्या माध्यमातून गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांना पुढच्या टप्प्यात नेत आहेत’, असे मला वाटत होते.
२. ‘सुप्रियाताई घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा हा भाववृद्धी सत्संग आहे’, असे वाटणे
‘प्रत्येक साधकाने मन निर्मळ करावे’, असा ताईचा भाव आहे. ताई सांगत असलेले दृष्टीकोन ऐकतांना माझी भावजागृती होत होती. ‘हा व्यष्टी साधनेचा आढावा नसून भाववृद्धी सत्संग आहे आणि ताई प्रत्येक साधकाचे बोट धरून साधकाला पुढच्या स्थितीला घेऊन जात आहे’, असे मला जाणवत होते.
३. एका साधकाने सांगितलेली मनाची विचारप्रक्रिया आणि त्या संदर्भात सौ. सुप्रिया यांनी दिलेले दृष्टीकोन
३ अ. एका साधकाची स्वतःच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया : एका साधकाने आढाव्यात सांगितले, ‘‘माझ्या साधनेचे प्रयत्न चांगले होत आहेत; पण माझ्या प्रयत्नांची नोंद घेतली जात नाही’, असे मला वाटते आणि ‘माझे काही चुकेल’, या विचाराने मी प्रसंगाला सामोरे जाण्याचे टाळतो.’’
३ आ. साधकाच्या वरील विचारप्रक्रियेच्या संदर्भात सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले दृष्टीकोन
३ आ १. कृतीच्या स्तरावर सर्व प्रयत्न होत असले, तरी मनाच्या स्तरावर प्रयत्न होत नसल्यामुळे फलनिष्पत्ती न्यून होते ! : त्यावर सुप्रियाताईने सांगितले, ‘‘साधकांचे कृतीच्या स्तरावर प्रयत्न होतात, उदा. वहीत चुका लिहिणे, फलकावर चुका लिहिणे, क्षमायाचना करणे, समष्टीत चूक सांगणे; मात्र साधकांचे मनाच्या स्तरावर प्रयत्न होत नाहीत. योग्य विचार करण्यासाठी ‘आपला उद्देश काय आहे ?’, याचे चिंतन करायला हवे, उदा. ‘चूक झाली, तर ‘प्रयत्न न्यून झाले’, या विचाराने नकारात्मकता वाढेल’, असा विचार मनात आल्यास फलनिष्पत्ती न्यून होते.
३ आ २. चुका होण्यामागील विचारप्रक्रियेचे सखोल चिंतन केल्यास चुका पुनःपुन्हा होत नाहीत ! : साधनेमध्ये ‘योग्य विचार काय आहे ?’, यालाच महत्त्व आहे. शुद्ध विचाराने अंतर्मनाची साधना होऊन प्रयत्नांची गती वाढते. ‘विचारांची सखोलता आणि अंतर्मुखता न वाढवल्यास प्रयत्नांची गती बाह्यतः दिसेल; पण अंतर्मुखता न्यून होईल. ‘चूक झाली, तर क्षमायाचना करणे’, यापेक्षा ‘चूक का झाली ? त्यामागे विचारप्रक्रिया काय होती ?’, असे चिंतन केल्यावर चुका पुनःपुन्हा होत नाहीत. ‘फलकावर चुका लिहिणे, चुका समष्टीत सांगणे आणि वहीत लिहिणे’, ही बाह्य शुद्धी आहे. व्यष्टी साधना शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सतत शिकायचे आहे. असे झाले नाही, तर पुनःपुन्हा चुका होतात.
३ आ ३. ‘माझे अंतर्मन पहाण्यासाठी माझ्या चुका सांगितल्या जात आहेत’, असा विचार मनात असायला हवा ! : ‘मी एवढे केले, तरीही साधक माझ्या चुका सांगतात’, असा विचार करायला नको. ‘मी माझे अंतर्मन पहाण्यासाठी माझ्या चुका सांगितल्या जात आहेत’, असा विचार असायला हवा. आपल्यातील बहिर्मुखता आणि भावनाशीलता यांमुळे ‘साधक माझ्याच चुका सांगतात’, असे आपल्याला वाटते; पण ही अंतर्मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे.’’
४. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. अंतर्मन भगवंताला जोडून ठेवण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेचे महत्त्व सांगितले आहे. व्यष्टी साधना, म्हणजे अंतर्मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे.
आ. क्षात्रवृत्ती आणि प्रेमभाव’ यांचा समतोल कसा साधावा ? मनाच्या तळाशी जाऊन प्रत्येक प्रसंग आणि विचार यांचे चिंतन कसे करायचे ? शिकण्यासाठी प्रयत्न कसे करायचे ?
५. ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यात गुरुकृपेचा वर्षाव होत आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला
‘परात्पर गुरुमाऊलींनी ‘या आढाव्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रसंगात दृष्टीकोन देऊन तो स्वतःला कसा लागू करून घेऊ शकतो ?’, ही शिकवण दिल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
(पू.) श्रीमती मंदाकिनी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१२.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |