एन्.आय.ए.कडून दाऊद इब्राहिम याची माहिती देणार्‍याला २५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार यांना पकडून देण्यासाठी रोख रकमेची घोषणा केली आहे. दाऊदला पकडू देणार्‍या व्यक्तीला एन्.आय.एन्.कडून २५ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. मुंबईमध्ये वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांसमवेतच शस्त्रांस्त्रांची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा प्रकरण, आतंकवादी आक्रमणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये दाऊद हा आरोपी आहे.

दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम, दाऊदचा जवळचा साथीदार जावेद पटेल उपाख्य जावेद चिकना, शकील शेख उपाख्य छोटा शकील यांच्यासमवेत इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक मेमन उपाख्य टायगर मेमन यांना पकडून देणार्‍यांसाठीही बक्षिसांची घोषणा केली आहे. छोटा शकीलला पकडून देणार्‍याला २० लाख, तर अनीस, चिकना आणि मेनन यांना पकडून देणार्‍याला प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

संपादकीय भूमिका 

दाऊद इब्राहिम पाकमध्ये लपला आहे, याचे असंख्य पुरावे आणि माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे उपलब्ध आहे. असे असतांना पाकमध्ये घुसून त्याला फरफटत भारतात आणण्याऐवजी अशा प्रकारे बक्षीस घोषित करण्याची वेळ भारतीय सुरक्षा यंत्रणांवर येणे, हे लज्जास्पद होय !