साधक हे श्री गुरूंचेच रूप असणे आणि त्या माध्यमातून ते शिकवत असणे
‘पूर्वी मला प्रश्न पडायचा, ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना जसे प्रत्यक्ष श्री गुरूंकडून शिकण्याची, म्हणजे विद्या ग्रहण करण्याची संधी मिळाली, तसे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रत्यक्ष शिकायला का मिळत नाही ?’ त्यावर देवाने मला सुचवलेले उत्तर पुढे दिले आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या माध्यमातून शिकवतात किंवा साहाय्य करतात ! : एकदा एका संतांच्या सत्संगात देवाने मला सुचवले, ‘देवाने आश्रमात साधकरूपी समष्टी दिली आहे. प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांच्या माध्यमातून प्रत्यक्षच आपल्याला शिकवत आहेत. प्रत्येक साधकाच्या डोळ्यांतून प.पू. गुरुदेवांचे आपल्यावर लक्ष आहे. प्रत्येक साधक आपल्याला साधनेविषयी जे सांगतो, ते प.पू. गुरुदेवच सांगत असतात. साधकांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच आपल्या साहाय्यासाठी धावून आलेले असतात.
२. प्रत्येक साधकामध्ये श्री गुरूंचे सूक्ष्म रूप असल्याने प्रत्येक साधक श्री गुरूंचेच रूप असणे : आपण जसे प.पू. गुरुदेवांशी वागतो, तसेच साधकांशी वागले पाहिजे. तेच गुरुदेवांना अपेक्षित आहे. प.पू. गुरुदेवांशी आपण आदराने आणि श्रद्धेने बोलतो, तसेच सर्व साधकांशी नम्रतेने बोलले पाहिजे. आपण तसे बोलत नसल्यास श्री गुरूंना ते आवडेल का ? प्रत्येक साधकाची काही ना काही साधना असल्याने आणि त्याच्यामध्ये असणार्या गुणांमुळेच तो गुरुप्रिय होऊन आश्रमात, म्हणजे श्री गुरूंच्या छत्रछायेखाली आलेला असतो. प्रत्येक साधकामध्ये श्री गुरु सूक्ष्म रूपातून असतातच. त्यामुळे प्रत्येक साधक हा आपल्यासाठी गुरुरूपच असतो.’
‘प.पू. गुरुदेव, असे आपल्याला प्रिय असलेले साधक आम्हाला लाभले आहेत आणि त्या साधकांच्या माध्यमातून तुम्हीच आम्हाला घडवत आहात’, हा कृतज्ञताभाव ठेवण्यात मी अजूनही फार अल्प पडते. तुम्हीच तो भाव माझ्यामध्ये निर्माण करू शकता. तुम्हीच मला या गोष्टीची जाणीव करून दिली आहे. ‘तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या. तुम्ही दिलेला विचार तुमच्याच चरणी समर्पित करून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. वेदिका दहातोंडे (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.११.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |