श्री गणेशमूर्ती विसर्जन परंपरेप्रमाणे चक्रेश्‍वर नैसर्गिक तलावातच करणार ! – वसई तालुक्यातील सोपारा गावातील ग्रामस्थांचा निर्धार

ग्रामस्थांच्या मागणीला वसई विरार शहर महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद

प्रतीकात्मक छायाचित्र

वसई – श्री गणेशमूर्तींचे विसर्जन परंपरेप्रमाणे सोपारा गावातील चक्रेश्‍वर नैसर्गिक तलावातच केले जाईल, याविषयी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणीला वसई विरार शहर महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

निवेदन स्वीकारल्यावर महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आश्‍वासन देतांना म्हणाले, ‘‘मातीच्या गणेशमूर्ती चक्रेश्‍वर नैसर्गिक तलावात विसर्जित करता येतील; पण प्लास्टर पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन वसई विरार शहर महापालिकेने सोपारा गावात केलेल्या कृत्रिम तलावात करावे; मात्र याविषयी आम्ही सक्ती करणार नाही.’’

वसई विरार शहर महापालिकेने वृत्तपत्रांतून नोटिसीद्वारे ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिकेने सोपारा गावात केलेल्या कृत्रिम तलावातच करावे’, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सोपारा गाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन ‘आमच्या धर्मभावनांचा आदर राखावा’, तसेच ‘श्री गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जनाची अनेक पिढ्यांपासून चालू असलेल्या परंपरेत आम्ही खंड पडू देणार नाही’, अशी महापालिका आणि पोलीस प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीत विनंती केली होती आणि त्यानंतर वरील निवेदनही दिले.