डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न
कुडाळ – मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महामार्गाच्या कामामध्ये जर कुणी जाणीवपूर्वक अडथळे आणत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर थेट गुन्हा नोंद करून कारवाई करावी. महामार्गाचे काम हे राष्ट्रीय काम आहे. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.
मंत्री चव्हाण यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट या दिवशी जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची पहाणी केली, तसेच महामार्गाच्या कामातील अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर एम्.आय.डी.सी.च्या विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीस माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार राजन तेली यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच आलेल्या चव्हाण यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
या वेळी मंत्री चव्हाण यांनी अधिकार्यांना सूचना देतांना सांगितले की, महामार्गावर अपघातामध्ये जीवितहानी होत आहे. याला रखडलेली कामे कारणीभूत ठरत आहेत. रखडलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि प्रांताधिकारी यांनी कार्यवाही करावी. भूमीच्या मोबदल्याचा प्रश्न, मोरीचा प्रश्न, फूट ओव्हर ब्रीज (पदपूल), कुडाळ येथे आर्.एस्.एन्. हॉटेल जवळ ‘ब्लिंकर्स (उघडझाप करणारे दिवे), रम्बलर्स (गती अल्प करण्यासाठीचे अडथळे) आणि रिफ्लेक्टर्स’ (रस्त्याच्या बाजूने लावलेल्या काळोखातही चमकणार्या पट्ट्या) लावणे, ज्या ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पुलाची आवश्यकता आहे, अशा सर्व ठिकाणांचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत.
मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे दुसर्या ‘लेन’चे (बाजूचे) काम चालू
कणकवली – सलग २ अपघात झाल्यानंतर जागे झालेले प्रशासन आणि मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारे ठेकेदार आस्थापन यांनी शहरातील गडनदी पूल ते गोपुरी आश्रम या भागांत बंद असलेले महामार्गाच्या दुसर्या बाजूचे (लेनचे) काम २७ ऑगस्टपासून चालू केले. या भागातील एक बाजू बंद असल्याने एकाच बाजूने दोन्ही दिशेची वाहतूक चालू होती. त्यामुळे येथे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पूल ते गोपुरी आश्रम या रस्त्यासाठी भूमी दिलेल्यांना अद्याप भूमीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे येथील रस्त्याच्या दुसर्या लेनचे काम थांबले होते. त्यामुळे या भागात एकाच बाजूने वाहतूक चालू होती. यामुळे येथे वारंवार अपघात घडत होते. २६ ऑगस्ट या दिवशी कंटेनर आणि ट्रॅक्स यांच्यात भीषण अपघात होऊन ट्रॅक्सचा चालक जागीच ठार झाला होता. याच ठिकाणी पुन्हा दुसरा अपघात होऊन २ वाहनांची हानी होण्यासह दोघे घायाळ झाले. पहिल्या घटनेनंतर स्थानिकांनी प्रशासन आणि ठेकेदार आस्थापन यांच्या कारभाराच्या विरोधात तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत चालकाचा मृतदेह कह्यात घेण्यास विरोध करत रस्ताबंद आंदोलन केले होते. अखेर चालकाच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे, तसेच महार्गाविषयी असलेल्या समस्या येत्या २० दिवसांत सोडवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी चालकाचा मृतदेह नेण्यास अनुमती दिली अन् महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. भूमीचा मोबदला देण्याची ग्वाही मिळाल्यानंतर भूमी मालकांनीही रस्त्याचे काम करण्यास अनुमती दिली. त्यानंतर दुसर्या लेनचे काम चालू झाले.
संपादकीय भूमिकावित्त आणि जीवितहानी झाल्यावर ठेकेदार आणि प्रशासन यांना जाग आली का ? |