विद्यापीठ अनुदान आयोगाकडून बोगस विद्यापिठांची सूची घोषित !

पुणे – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस विद्यापिठांची सूची घोषित केली आहे. त्याअन्वये देशात २१ बोगस विद्यापिठे असून सर्वाधिक बोगस विद्यापिठे राजधानी देहलीत आहेत. (एवढी बोगस विद्यापिठे होईपर्यंत संबंधित राज्यांतील प्रशासनाला कळले कसे नाही ? अधिकारी झोपले होते का ? – संपादक)

सूचीत देहलीतील ८, उत्तरप्रदेशातील ४, ओडिशा आणि बंगाल मध्ये प्रत्येकी २, तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि पुदुच्चेरी येथे प्रत्येकी १ बोगस विद्यापीठ असल्याचे नमूद केले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय, राज्य आणि अभिमत विद्यापिठांना किंवा संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार संस्थांना पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे; मात्र त्या संस्थांना त्यांच्या नावात ‘विद्यापीठ’ हा शब्द वापरता येत नाही. संबंधित २१ संस्था विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना बोगस ठरवले आहे, अशी माहिती यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी दिली.