गणेशोत्सवानिमित्त गावाला जाणार्‍या भाविकांना भरमसाठ दराने तिकीटविक्री होत असूनही राज्य परिवहन विभागाचे दुर्लक्ष !

खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर तिकिटाचे दुप्पट-तिप्पट दर असूनही तक्रारीनंतरच कारवाई करण्याची राज्य परिवहन विभागाची भूमिका !

खासगी ट्रॅव्हल बस

मुंबई, २७ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सवासाठी गावाला जाणार्‍या भाविकांकडून खासगी ट्रॅव्हल्स तिकिटाचे दुप्पट-तिप्पट दर आकारत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर तिकिटांचे भरमसाठ तिकीटदर देण्यात आले आहेत. अशा प्रकारे नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट चालू असूनही त्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट ‘कुणी तक्रार केली, तरच कारवाई करण्यात येईल’, असे राज्य परिवहन विभागाचे उपायुक्त अभय देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

१. शासनाच्या आदेशानुसार खासगी ट्रॅव्हल्सना राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या दराच्या दीडपट अधिक तिकीटदर आकारण्याची मुभा आहे. असे असतांना गणेशोत्सवासाठी गावाला जाणार्‍या भाविकांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन खासगी ट्रॅव्हल्सकडून भाविकांना भरमसाठ दराने तिकट आकारले जात आहे.

२. मुंबई-कोल्हापूर या मार्गासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विनावातानुकूलित (नॉन ए.सी.) स्लीपर गाडीचे तिकीट ८०७ रुपये आहे. या दरानुसार खासगी ट्रॅव्हल्सना अधिकतम १ सहस्र २१० इतके तिकीट आकारता येते; परंतु या मार्गाची खासगी टॅ्रव्हल्सची तिकिटे अवाच्या सवा आहेत.

३. मुंबई-कोल्हापूर या मार्गाचे आजरा ट्रॅव्हल्स (विनावातानुकूलित) गाडीचे तिकीट १ सहस्र ८०० रुपये इतके आहे. व्ही.आर्.एल्. ट्रॅव्हल्स गाडीचे तिकीट २ सहस्र ४०० रुपये, तर आनंद ट्रॅव्हल्स (वोल्वो, वातानुकूलित) या गाडीचे तिकीट ३ सहस्र ४१० रुपये इतके आहे. यांसह मुंबई-रत्नागिरी या मार्गाचे एस्.टी. गाडीचे (विनावातानुकूलित) तिकीट ५१४ रुपये इतके आहे. शासनाच्या आदेशानुसार खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांना या मार्गाचे अधिकतम ७७१ रुपयापर्यंत तिकीट वाढवता येईल; मात्र याच मार्गाचे सान्वी ट्रॅव्हल्स या खासगी गाडीचे तिकीट २ सहस्र रुपये इतके आकारण्यात आले आहे. अशा प्रकारे अन्य खासगी ट्रॅव्हल्सची तिकिटेही दुप्पट-तिप्पट आहेत.

अधिकारी स्वत: तिकीट काढून कारवाई का करत नाहीत ?

‘खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर तिकिटांचे अवैधपणे भरमसाठ दर आकारले जात असूनही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांनी तिकिट काढले, तरच कारवाई करू’, असे सांगणारे अधिकारी सरकारकडून कोणत्या कामाचे वेतन घेत आहेत. राज्य परिवहन विभागाला खरोखरच कारवाई करायची असेल, तर अधिकारी स्वत: तिकीट काढून कारवाई का करत नाहीत ?, असा प्रश्न विचारला जात आहे.

खाजगी ट्रॅव्हल्स नि वाढवलेले भरमसाठ भाडे

 

जनतेच्या पैशांविषयी कसलेही देणघेणे नसलेले राज्य परिवहन विभागाचे अधिकारी !

(म्हणे) ‘संकेतस्थळांवर तिकीटदर अधिक असले, तरी कारवाई करू शकत नाही !’ – अभय देशपांडे, उपआयुक्त, राज्य परिवहन विभाग

खासगी ट्रॅव्हल्सना राज्य परिवहन गाड्यांच्या दीडपट तिकीटदर आकारता येतो. हे खासगी वाहतूकदारांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सूचना देण्याची आवश्यकता नाही. त्यावर कारवाई हेच उत्तर आहे, असे राज्य परिवहन विभागाचे उपआयुक्त अभय देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर भरसाठ तिकीटदर आकारल्याची माहिती दिल्यानंतर देशपांडे म्हणाले, ‘‘संकेतस्थळावर तिकिटाचे दर अधिक असले, तरी त्यावर कारवाई करू शकत नाही. संकेतस्थळावर केवळ तिकीटदर प्रकाशित केले, तर तो सबळ पुरावा मानता येत नाही; कारण त्यातून क्रिया पूर्ण होत नाही. त्यासाठी तिकिट काढणे आवश्यक आहे. तक्रारी आल्या, तर कारवाई केली जाईल.’’

खाजगी ट्रॅव्हल्स नि वाढवलेले भरमसाठ भाडे!

 

नागरिकांनो, फसवणुकीच्या विरोधात लेखी तक्रार प्रविष्ट करा !

नागरिकांनो, खासगी ट्रॅव्हल्सकडून होणार्‍या फसवणुकीच्या विरोधात राज्य परिवहन विभागाच्या स्थानिक कार्यालयात लेखी तक्रार प्रविष्ट करा. तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्यास संबंधित अधिकार्‍यांची लेखी तक्रार राज्य परिवहन आयुक्तांकडे करा. त्यावरही कारवाई न झाल्यास याविषयी राज्य परिवहनमंत्री किंवा मुख्यमंत्री यांकडे तक्रार प्रविष्ट करा.

खाजगी ट्रॅव्हल्स नि वाढवलेले भरमसाठ भाडे

लोकहो, कृतीशील व्हा !

गणेशोत्सवकाळात भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सकडून होणार्‍या आर्थिक लुटीच्या विरोधात पोलीस आणि ‘आर्.टी.ओ.’ यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करा !, तसेच विविध खासगी ट्रॅव्हल्सनी वाढवलेले अवाच्या सवा भाडेदर यांविषयीची माहिती आणि तक्रार करण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या राज्यातील कार्यालयांचे संपर्क क्रमांक आणि ईमेल यांची माहिती दिलेली आहे. सर्वांनीच या लिंकवरील माहितीचा लाभ घेऊन समाजकर्तव्य पार पाडावे !


गणेशोत्सवाच्या काळात भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सकडून होणार्‍या आर्थिक लुटीच्या विरोधात पोलीस आणि ‘आर.टी.ओ.’कडे तक्रार प्रविष्ट करा !

दुप्पट ते तिप्पट दर आकारून गणेशोत्सवानिमित्त गावाला जाणार्‍या भाविकांची खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून आर्थिक लूट चालू आहे. या विरोधात स्थानिक पोलीस ठाणे आणि आपल्या जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (R.T.O) यांच्याकडे लेखी तक्रार प्रविष्ट करा. तक्रारीचा नमुना सोबत देत आहोत. यामध्ये स्वत:च्या तिकिटाचा तपशील त्यामध्ये भरून तक्रार करावी.

अ. तक्रार कुठे करावी ? –

१. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (RTO) स्थानिक कार्यालय (राज्यातील उपप्रादेशिक विभागाच्या कार्यालयाचा पत्ता आणि ईमेल सोबत पाठवत आहोत.)
२. स्थानिक पोलीस ठाणे (तक्रारीचा नमुना सोबत जोडला आहे.)

आ. तक्रारी सोबत जोडावयाची कागदपत्रे

१. तिकिटाची झेरॉक्स
२. शासनाच्या आदेशाच्या प्रती

इ. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची प्रत पुढील ठिकाणीही मेलद्वारे पाठवूया !

१. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ([email protected])
२. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य ([email protected])
३. परिवहन आयुक्त, मोटार वाहन विभाग ([email protected])

टीप :

१. उपप्रादेशिक परिवहन विभागात तक्रार केल्यावर त्याची पोच घ्यावी. हा तक्रारीची पोच मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि परिवहन आयुक्त यांना पाठवावी.
२. तक्रारीसाठी वापरलेले तिकिटाची मूळ प्रत जपून ठेवावी.


दिनांक :
प्रति,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

……………………….

विषय : अवाजवी तिकीटदर आकारून केलेल्या आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याबाबत…

मा. महोदय,

मी ……….(पूर्ण नाव)…………, रहाणार ………(पूर्ण पत्ता)……………………………… मी आपणाकडे खालीलप्रमाणे तक्रार करत आहे.

दिनांक :……………..या दिवशी मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त जाण्यासाठी खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सचे तिकिट काढले. या तिकिटाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

खासगी ट्रॅव्हल्सचे नाव :
प्रवासाचा मार्ग :
प्रवासाचा दिनांक :
प्रवासाचा वेळ :
तिकिटाची रक्कम :

हे तिकीट मी ………..येथील ………………ट्रॅव्हल्सच्या तिकिट बुकींग स्टॉलवर / ………. या ऑनलाईन ॲपवरून काढले आहे. तिकिट काढल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीटदराविषयी शासनाने काही नियम घालून दिले असल्याचे मला कळले. या नियमानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सना तिकिटाचा अधिकतम दर हा परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या तुलनेत दीडपटीपर्यंत वाढवता येतो. यानुसार माझे तिकीट तपासले असता माझ्याकडून दीडपटीपेक्षा अधिक पैसे घेण्यात आल्याचे माझ्या लक्षात आले. याचा अर्थ …………… ट्रॅव्हल्सचे चालक, मालक, संचालक, तसेच तत्सम व्यक्ती यांनी एकत्रितपणे सरकारी नियमांचे उल्लंघन करून माझ्याकडून तिकिटाचे अधिक पैसे घेऊन माझी आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी माझी तक्रार असून माझी फसवणूक करण्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

आपला विश्वासू,
स्वाक्षरी
नाव :
संपर्क क्र. : 

सोबत जोडत आहे – 

१. शासनाचा आदेश
२. खासगी गाडीचे तिकिट

प्रत :
१. परिवहनमंत्री २. परिवहन आयुक्त


दिनांक :
प्रति,
प्रादेशिक परिवहन अधिकारी,

……………………….

विषय : अवाजवी तिकीटदर आकारून केलेल्या आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याबाबत…

मा. महोदय,

मी ……….(पूर्ण नाव)…………, रहाणार ………(पूर्ण पत्ता)……………………………… मी आपणाकडे खालीलप्रमाणे तक्रार करत आहे.

दिनांक :……………..या दिवशी मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त जाण्यासाठी खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सचे तिकिट काढले. या तिकिटाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

खासगी ट्रॅव्हल्सचे नाव :
प्रवासाचा मार्ग :
प्रवासाचा दिनांक :
प्रवासाचा वेळ :
तिकिटाची रक्कम :

हे तिकीट मी ………..येथील ………………ट्रॅव्हल्सच्या तिकीट बुकींग स्टॉलवर / ………. या ऑनलाईन ॲपवरून काढले आहे. तिकीट काढल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीटदराविषयी शासनाने काही नियम घालून दिले असल्याचे मला कळले. या नियमानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सना तिकिटाचा अधिकतम दर हा परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या तुलनेत दीडपटीपर्यंत वाढवता येतो. यानुसार माझे तिकीट तपासले असता माझ्याकडून दीडपटीपेक्षा अधिक पैसे घेण्यात आल्याचे माझ्या लक्षात आले. याचा अर्थ …………… ट्रॅव्हल्सचे चालक, मालक, संचालक, तसेच तत्सम व्यक्ती यांनी एकत्रितपणे सरकारी नियमांचे उल्लंघन करून माझ्याकडून तिकिटाचे अधिक पैसे घेऊन माझी आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी माझी तक्रार असून माझी फसवणूक करण्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

आपला विश्वासू,
स्वाक्षरी
नाव :
संपर्क क्र. :

सोबत जोडत आहे –

१. शासनाचा आदेश
२. खासगी गाडीचे तिकीट

प्रत :

१. परिवहनमंत्री २. परिवहन आयुक्त


शासनाच्या आदेशाच्या प्रती

Download

 

Download

 

 

संपादकीय भूमिका

उत्सवाच्या काळात खासगी बसगाड्यांनी प्रवाशांकडून भरमसाठ तिकीट आकारणे, ही जनतेची लूट आहे. अशा प्रकारची लूट वर्षांनुवर्षे चालू असतांना प्रशासन झोपले आहे का कि ही लूट त्याला मान्य आहे ? याविषयी अनेक वेळा तक्रारी करूनही जनतेची समस्या सुटत नाही, हे संतापजनक आहे. नागरिकांच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या जनताद्रोही प्रशासनाला आता जनतेने संघटित होऊन जाब विचारणे आवश्यक !