कौटुंबिक संबंध चांगले राखा. ताणतणाव निर्माण करण्यामध्ये कौटुंबिक संबंध हे एक अतिशय महत्त्वाचे कारण असते. पती-पत्नी, पिता-पुत्र, आई–मुलगी किंवा घरातील अन्य नातेवाइकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी तुमची स्वतःची ‘हे संबंध चांगले व्हावेत’, अशी इच्छा असणे आवश्यक असते. तुम्ही तुमच्याकडील एक टोक सैल सोडले, तर संबंध ताणले जाणार नाहीत. हे संबंध टिकवायचे असतील, तर त्या संबंधातून तुमच्याकडून कोणतीही अट घातलेली असू नये. ‘त्याने असे वागले, तर मी त्याचे तोंड पहाणार नाही’, अशी प्रतिज्ञा कराल, तर संबंध कसे चांगले रहातील ? नात्यात मानापमानाला अधिक महत्त्व देणारे नेहमीच तणावाखाली असतात. याविषयी तुम्ही थोडे क्षमाशील असणे आवश्यक असते.
क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ।
अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यति ।।
– महाभारत, पर्व ५, अध्याय ३३, श्लोक ४८
अर्थ : ज्याच्या हाती क्षमा हे शस्त्र असते, त्याला दुर्जन काहीही करू शकत नाही. गवत नसलेल्या भूमीवर अग्नी पडला, तर तो स्वतःच शांत होतो.
या सुभाषिताची नेहमी आठवण ठेवा. यातून संबंध सुधारण्यास साहाय्य होत असते.
(साभार : मासिक ‘भाग्यनिर्णय’)