सातारा येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. माधुरी प्रकाश दीक्षित (वय ६४ वर्षे) यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यावर अनुभवलेली संतांची प्रीती आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही दोघे (यजमान श्री. प्रकाश दीक्षित (आताची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आणि वय ७३ वर्षे) अन् मी)) गाडीवरून पडल्यामुळे आमचा अपघात झाला. त्यामुळे आम्हा दोघांचीही शारीरिक स्थिती चांगली नव्हती. यजमानांच्या पायाचे शस्त्रकर्म झाल्यानंतर २४.१.२०१९ या दिवशी आम्ही दोघे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आलो.

१. रामनाथी आश्रमात आल्यावर श्री गुरूंच्या कृपेने अनुभवलेले साधकांचे प्रेम !

श्री. प्रकाश दीक्षित

१ अ. रामनाथी आश्रमात आल्यावर साधकांनी सामान खोलीत नेण्यास साहाय्य करणे आणि यजमानांना चाकांच्या आसंदीतून खोलीत नेणे : आम्ही रामनाथी आश्रमात पोचल्यावर साधकांनी यजमानांना चाकांच्या आसंदीवरून खोलीत नेले आणि मला सामान खोलीत नेण्यास साहाय्य केले. साधकांचे साहाय्य आणि निरपेक्ष प्रेम आम्हाला लगेचच अनुभवता आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सगळ्या साधकांना प्रीतीरूप आणि वात्सल्यरूप घडवले आहे.  देवाची लीलाच न्यारी !

१ आ. यजमानांना चालता येत नसल्यामुळे साधकांनी खोलीतच भाववृद्धी सत्संग ऐकण्याची सोय करणे आणि त्यामुळे गुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव वाढीस लागणे : साधकांनी आम्हाला व्यष्टी साधनेचा आढावा आणि भाववृद्धी सत्संग यांना उपस्थित रहाण्यास सांगितले. यजमान चालू शकत नव्हते; म्हणून साधकांनी आम्हाला खोलीतच भाववृद्धी सत्संग ऐकण्याची सोय उपलब्ध करून दिली. व्यवहारात कुणी कुणाचा एवढा विचार करत नाहीत; मात्र ‘साधक इतरांचा किती विचार करतात !’, हे आम्हाला इथे प्रत्यक्ष अनुभवता आले. त्यामुळे माझ्या मनातील श्री गुरूंप्रतीचा भाव सतत वाढतच गेला. ‘तो पुढेही असाच वाढत राहो’, ही त्यांच्या चरणी प्रार्थना !

२. आश्रमातील आधुनिक वैद्य ‘तपासणी करतांना ऊर्जा देत आहेत’, असे जाणवणे

सौ. माधुरी दीक्षित

आश्रमात आल्यावर तेथील आधुनिक वैद्य आमची तपासणी करायचे. तिथे ‘केवळ औषधे लिहून देणे’, एवढाच भाग न होता आधुनिक वैद्य ‘आमचे शरीर चांगले होण्यासाठी आम्हाला ऊर्जाही देत आहेत’, असे मला जाणवायचे.

३. साधकांनी भाववृद्धी प्रयोग करायला शिकवणे

साधकांनी आम्हाला देवाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी ‘भावाच्या स्तरावर प्रयत्न करून मन निर्विचार कसे करायचे ?’, हे शिकवले आणि सातत्याने भाव जागृत रहाण्यासाठी अन् त्यात वृद्धी होण्यासाठी भाववृद्धी प्रयोग करायला शिकवले.

४. संतांची अनुभवलेली प्रीती !

‘आश्रमात आल्यावर आश्रमातील संतांकडून मिळणारे चैतन्य आणि त्यांनी आमची वेळोवेळी केलेली विचारपूस’, यांतून मिळणारी ऊर्जा एवढी होती की, माझ्या शारीरिक त्रासांची जाणीव न्यून होत गेली.

५. मिळालेल्या पूर्वसूचना !

५ अ. ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्या’च्या दिवशी सकाळी गुरुदेवांच्या चरणकमलांची मानसपूजा केली जाणे आणि दुपारी ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा’ पाहिल्यावर त्याचा उलगडा होणे : १२.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा’ होता. याविषयी मला काहीही ठाऊक नव्हते. त्या दिवशी सकाळी मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले होते. त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणकमलांची मानसपूजा झाली. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘असे कसे झाले ?’ दुपारी ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा’ पाहिल्यावर मला त्याचा उलगडा झाला.

५ आ. गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची मानसपूजा केली जाणे अन् त्याच दिवशी दुपारी त्यांना गुरुदेवांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्यात येणे : मी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी आमच्या कुलदेवतेची मानसपूजा करते. १९.२.२०१९ या दिवशी सकाळी मी ध्यानमंदिरात श्री गुरुचरणांचे मानसपूजन केले. नंतर कुलदेवीची मानसपूजा करण्याच्या वेळी माझ्याकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची पूजा केली गेली. तेव्हा मला ‘परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ’, हे तिघे एकत्र दिसले. त्याच दिवशी दुपारी झालेल्या एका सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत नमस्कार करतांना नेहमी हातांत पणत्या धरलेले तीन गुरु माझ्या डोळ्यांसमोर येतात.

६. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

६ अ. जिना चढतांना श्वासाच्या समवेत नामजप होणे : आश्रमातील जिना चढतांना ‘त्या पायर्‍याच ‘नाम घे’, अशी आठवण करून देत आहेत’, असे मला जाणवायचे आणि प्रत्यक्षातही एकेक पायरी चढत असतांना श्वासाच्या समवेत माझे नाम होत होते.

६ आ. ‘दीपलक्ष्मी स्थापना’ पूजा होत असतांना ‘तेथे देवता उपस्थित आहेत’, असे मला दिसले.

६ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी आलेली अनुभूती : आम्ही रामनाथी येथे आल्यानंतर तिसर्‍या किंवा चौथ्या दिवशी यजमान मला म्हणाले, ‘‘मला अजून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ दिसल्या नाहीत’’ आणि त्याच दिवशी आम्हाला त्यांची ध्वनीचित्र-चकती दाखवली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयीही असेच घडले.

६ ई. २६.२.२०१९ या दिवशी दत्तमाला मंत्रपठणाला बसल्यावर ‘दारातून साक्षात् गुरुदेव सूक्ष्मातून आत येत आहेत आणि त्यांच्या चेहरा अन् डोळे यांतून साधकांकडे पुष्कळ वलये प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.

६ उ. प.पू. गुरुदेवांच्या हातातून सूर्यकिरणांसारखे पिवळसर किरण साधकांकडे जातांना दिसणे आणि तेव्हा ‘गुरुतत्त्व सगळीकडे सारखेच कार्यरत आहे’, असे अनुभवता येणे : एकदा मला दिसत होते, ‘प.पू. गुरुदेवांच्या हातातून सूर्याच्या किरणांसारखे पिवळसर किरण येत आहेत आणि ते मध्येच तुटक होऊन जेथे जेथे साधक आहेत, तेथे तेथे जात आहेत.’ यातून देवाने मला ‘गुरुतत्त्व सीमित नसून ते सगळीकडे सारखेच कार्यरत आहे आणि ‘भगवंताला मनातले सर्वकाही कळते’, हे दाखवून दिले. तेव्हा ‘मीच प्रयत्न करण्यात न्यून पडते’, याची मला जाणीव झाली. देवाच्या कृपेने आणि आश्रमातील चैतन्यामुळे ‘गुरुतत्त्व सूक्ष्म आहे’, हे मला अनुभवता आले.

‘प.पू. गुरुदेव आणि सर्व सद्गुरु साधकांच्या साधनेतील अडथळे अन् त्रास दूर व्हावेत आणि साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी पुष्कळ प्रयत्न करत आहेत; पण आमचीच देवाच्या प्राप्तीसाठीची तळमळ न्यून पडत आहे.

७. कृतज्ञता

गुरुविण नाही दुजा आधार ।। धृ. ।।
गुरु परमेश्वर गुरु माऊली ।
सदा कृपेची देई साउली ।
भक्तांसाठी गुरु होऊनी देव घेई अवतार ।। १ ।।

‘अशा श्री गुरूंनीच आम्हाला जवळ केले आहे’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. माधुरी प्रकाश दीक्षित (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६४ वर्षे), सातारा (३.३.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक