प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावरील जीवघेणे आक्रमण : एक धार्मिक उन्माद

देशात वाढत असलेली जिहादी विषवल्ली समूळ नष्ट करण्यासाठी सरकार, पोलीस आणि प्रशासन यांनी कठोर प्रयत्न करणे आवश्यक !

सलमान रश्दी
१२ ऑगस्ट २०२२ या दिवशी न्यूयॉर्क येथे एका कार्यक्रमाच्या वेळी ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर ‘हादीमत्तार’ नावाच्या २४ वर्षीय मुसलमान माथेफिरू जिहाद्याने जीवघेणे आक्रमण केले. तो न्यूयॉर्कजवळच न्यू जर्सी येथील संस्थेत रहातो.

रश्दी हे एक ललित लेखक असून त्यांचा जन्म भारतातीलच ! त्यांनी अनेक चांगली आणि लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. त्यामुळे त्यांना समीक्षक आणि सामान्य वाचक दोघांनीही गौरवलेले आहे; पण वर्ष १९८८ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकातील काही लिखाण इस्लाम धर्मियांना आक्षेपार्ह वाटले. शिया मुसलमानांचे तेव्हाचे एक सर्वोच्च धार्मिक नेते आयतोल्ला खोमेनी यांनी त्यांच्या अनुयायांना आदेश दिला की, रश्दी यांनी कुराण आणि पैगंबर यांचा अवमान केला आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारी १९८९ या दिवशी त्यांना तात्काळ देहदंडाची शिक्षा फर्मावली. या फतव्यानंतर रश्दी यांनी ‘आपल्या लिखाणामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मी क्षमा मागतो’, असेही सांगितले; परंतु तरीही हा फतवा मागे घेण्यात आलेला नाही. त्या वेळेपासून रश्दी हे कायम भयाच्या सावलीतच जगत आलेले आहेत. ते ब्रिटीश नागरिक असल्याने त्यांना सरकारने संरक्षण दिलेले आहे; पण त्या घटनेनंतर त्यांना कायम लपून छपून जगावे लागत आहे. ‘कधी कुठला माथेफिरू हत्या करील’, या शंकेने आणि भीतीच्या छायेत ३३ वर्षे अशा प्रकारे जगावे लागणे, हे अतिशय अमानुष क्रौर्य आहे.

१. रश्दी यांच्या पुस्तकाचे भाषांतर करणार्‍यांवर जीवघेणे आक्रमण केले जाणे आणि भारतात त्यांच्या पुस्तकावर तत्कालीन काँग्रेस सरकारने बंदी घालणे

‘द सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकाचे ज्यांनी जपानीमध्ये भाषांतर केले, त्या ‘हितोषी इगाराशी’ या जपानी लेखकाचीही हत्या करण्यात आली, तसेच आणखी दोन भाषांतरकर्त्या लेखकांवर जीवघेणे आक्रमण करण्यात आले, ज्यातून ते केवळ त्यांचे दैव बलवत्तर असल्यानेच बचावले ! या फतव्यानंतर काही मासांतच भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी एक सरकारी आदेश काढून त्याद्वारे ‘सॅटनिक व्हर्सेस’ कादंबरी भारतात विकणे अथवा आणणे निषिद्ध केले ! याआधी ती कादंबरी वाचण्याचेही कष्ट घेतले गेले नव्हते. आज कॉँग्रेससह जे जे विरोधी पक्ष मोठ्या जोरदारपणे अभिव्यक्तीस्वातंत्र्याविषयी माध्यमांमध्ये ओरडत असतात, त्यांनी त्या वेळेसही या आदेशाविषयी मौन पाळले होते आणि आजही ते रश्दी यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्या खुन्याच्या विरुद्ध पुढे येत नाहीत. त्यावरूनच त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे प्रेम किती बेगडी आहे ? याची साक्ष पटते.

२. हादीमत्तारने ‘हेजबोल्लाह’ या आतंकवादी संघटनेच्या प्रभावाखाली येऊन रश्दी यांच्यावर आक्रमण केल्याची शक्यता असणे

रश्दी यांच्यावर आक्रमण करणारा हादीमत्तार याचा जन्म कॅलिफोर्निया येथे झाला. त्याचे आई-वडील दोघेही लेबनॉन येथील यारून या दक्षिणेकडील लहान शहरातून अमेरिकेत पोचले. यारून या शहरात इराणपुरस्कृत ‘हेजबोल्लाह’ या आतंकवादी संघटनेचा पुष्कळ प्रभाव आहे. कदाचित् यामुळेच हादीमत्तार हा या संघटनेच्या प्रभावाखाली आला असावा. त्यामुळे त्याने इराणच्या या फतव्यानुसार रश्दी यांना मारण्याचे ठरवले असेल. अशा संघटनेच्या प्रभावाखालील लोकांना अमेरिकी सरकार आपल्या देशात येण्याची अनुमती देते, हेही एक आश्चर्यच आहे. आता त्याचे वडील परत आपल्या गावी म्हणजेच यारून येथे गेलेले आहेत आणि त्यांनी स्वत:ला समाजापासून एकटे बंदिस्त करून घेतले आहे. आईला आपल्या मुलाने केलेले हे भयानक दुष्कृत्य अजिबात आवडलेले नाही. तिने सांगितले, ‘वर्ष २०१८ मध्ये हादीमत्तार लेबनॉन येथे गेला होता. तो परत आल्यावर संपूर्णपणे पालटला होता. तो एकलकोंडा रहात असे आणि त्याची ही लक्षणे काही चांगली नव्हती.’ अशी एक शक्यता आहे की, तिथे असतांना तो या आतंकवादी संघटनेच्या प्रभावाखाली आला असेल आणि परत येऊन काहीतरी भव्य (?), उदात्त कार्य (?) करण्याचे त्याने ठरवले असेल. यानंतर त्याने खोट्या नावाखाली एक वाहन अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) बनवून घेतले आणि नंतर या कार्यक्रमाचे विनामूल्य पास मिळवून तो तेथे गेला. त्यानंतर स्टेजवर चढून त्याने हे हीन काम केले ! अर्थात् या २४ वर्षांच्या माथेफिरूला ७५ वर्षीय रश्दी यांना मारणे काहीच कठीण नव्हते आणि त्यात काहीही शौर्यही नाही. हे भेकड माणसाचे काम आहे ! अर्थात् त्याला अमेरिकी पोलिसांनी पकडले आहे आणि त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवलेला आहे. आता यथावकाश त्याच्यावर खटला चालून त्याला शिक्षा होईलच !

३. इस्लामी कट्टर धर्मांध शिक्षणाविषयी खोलात जाऊन विचार करायला हवा !

असे असले, तरी घटनेनंतर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. आपल्या समाजाच्या सुख-शांती-समृद्धीसाठी त्यांचा विचार करणे अतिशय आवश्यक आहे. एक म्हणजे े आक्रमण अमेरिकेत झाले. हा देश ‘एकूणच व्यक्तीस्वातंत्र्य हे मूल्य अतिशय महत्त्वाचे आहे’, असे मानणारा आणि श्रीमंत देश आहे. या खुनी युवकाची आर्थिक परिस्थिती सामान्य होती; पण फार गरिबीची नव्हती, तरीही याला असा गुन्हा करावासा का वाटला ? याची प्रेरणा अर्थात् टोकाच्या अतिरेकी धार्मिक उन्मादातून येते. आपण भारतात या प्रकारच्या उन्मादी आतंकवाद्यांशी गेली अनेक वर्षे झुंज देत आहोतच. अमेरिकेतसुद्धा वर्ल्ड ट्रेड सेंटर्सच्या ११ सप्टेंबर २००१ च्या भीषण आक्रमणामागे हीच प्रेरणा होती. याचा उगम इस्लामी कट्टर धर्मांध प्रशिक्षणामध्ये दिसून येतो. इस्लामी मदरसे असे प्रशिक्षण देत असतील, अशी रास्त शंका येते. सरकारी कायदा-सुव्यवस्था राखणार्‍या सर्व संस्थांनी या प्रश्नाचा खोलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे.

४. भारतातही सध्या घडणार्‍या घटनांमागील विषवल्ली उपटणे अतिशय आवश्यक !

भारतात सध्या नूपुर शर्मा यांना सातत्याने येत असलेल्या धमक्या, त्यांच्या समर्थकांवर होत असलेले प्राणघातक आक्रमण, त्यांच्या होणार्‍या हत्या हेही अमेरिकेत घडलेल्या त्या ‘हाय प्रोफाइल’ (उच्च वर्गीय) गुन्ह्याचीच पुनरावृत्ती आहे. येथे आमच्या सामाजिक संस्था, माध्यमकर्मी, राजकारणी आणि न्यायव्यवस्था या सर्वांनी एकत्र येऊन ही विषवल्ली उपटणे अतिशय आवश्यक आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेच्या फसव्या मायाजालाचा इथे कडाडून निषेध केलाच पाहिजे, तसेच या प्रकारच्या गुन्ह्याचे अन्वेषण अधिक जलद गतीने करून त्यातील दोषी लोकांना पकडून कठोर शिक्षा देणे, हे त्वरेने केले पाहिजे, तरच पुढे येणार्‍या अशा नवीन गुन्हेगारांना जरब बसेल. अमेरिकेत हे अन्वेषण कसे होते ? आणि किती लवकर या खुन्याला शिक्षा होते ? हे कळेलच; पण आपल्या देशात मात्र आतापर्यंत ज्या लोकांना पकडले आहे, त्यांचा निकाल किती लवकर लागतो ? त्यावर पुढे असे गुन्हे न्यून होतील किंवा नाही ? हे ठरेल.

५. रश्दी यांच्या आक्रमणाच्या दृष्टीने इराण सरकारने दिलेली अजब प्रतिक्रिया

महत्त्वाचे म्हणजे या सर्व घटनेवर इराण सरकारने अशी अजब प्रतिक्रिया दिली आहे, ‘या सर्व घटनेस अमेरिकन सरकार आणि यांत गुंतलेले नागरिकच स्वत: उत्तरदायी आहेत !’ त्यांच्या धर्मगुरूने काढलेल्या फतव्यासंबंधी या सरकारने कधीही क्षमा मागितलेली नाही किंवा इतक्या वर्षांनंतर हा फतवा मागेही घेतला नाही. सगळ्या सुसंस्कृत जगाने याचा विरोध आणि निषेध केला नाही, तर असेच खून प्रत्यक्षही घडत रहातील आणि आपण ते उघड्या डोळ्यांनी बघत राहू !

– श्री. चंद्रशेखर नेने (साभार : साप्ताहिक ‘विवेक’)