देशातील प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी दंगलीची  स्थिती निर्माण करणे, ही रंगीत तालीम तर नव्हे ?

देशात धर्मांध आणि जिहादी यांच्याकडून निर्माण केल्या जात असलेल्या अराजकतेच्या स्थितीचे सरकारने समूळ उच्चाटन करावे, ही अपेक्षा!

देशात सर्वच क्षेत्रांमध्ये अशांतता आणि संघर्ष निर्माण करून वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी दंगल वा संघर्षाची स्थिती निर्माण करण्यापूर्वीची ही सगळी रंगीत तालीम तर नाही ना, याचा विचार होणे आवश्यक आहे.

१. स्वीडनमध्ये शरणार्थींनी दंगली करून अशांतता निर्माण करणे आणि युरोपमधील राष्ट्रांना भस्मासुराला जन्म दिल्याची जाणीव होणे

युरोपमधील अतिशय प्रगत, शांत, श्रीमंत, मानवाधिकारांची काळजी वगैरे वहाणारा, शरणार्थींसाठी आपल्या देशाची कवाडे सतत उघडी करणार्‍या स्वीडनमधील शहरे सध्या दंगलीच्या विळख्यात सापडली आहेत. अत्याधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या स्वीडन पोलिसांनाही या दंगली थांबवण्यात यश येतांना दिसत नाही. विविध शहरांमध्ये होणार्‍या दंगली आणि जाळपोळ यांमध्ये अनेक पोलीस कर्मचारीही घायाळ झाल्याचे वृत्त आहे. इंटरनेटवर सार्वजनिक झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये दंगलखोर ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत हिंसाचार करतांना दिसून आले. विशेष म्हणजे हा हिंसाचार घडवणारी मंडळी इस्लामी देशांमधून तेथील अत्याचाराला कंटाळून युरोपीय देशांमध्ये आश्रय घेतलेले शरणार्थी आहेत. अगदी वर्षभरापूर्वी ‘अशा शरणार्थी मंडळींना आश्रय देणे कसे मानवतावादाचे आहे’, अशी बोंब ठोकत युरोपीय राष्ट्रे फिरत होती. भारतानेही बांगलादेशी आणि रोहिंग्या शरणार्थींना उदार मनाने आश्रय देणे कसे आवश्यक आहे, याविषयी उपदेश करत होती; मात्र अवघ्या वर्षभरातच युरोपीय राष्ट्रांना आपण भस्मासुराला जन्म दिल्याची जाणीव झाली आहे.

युरोपीय राष्ट्रांसाठी हा एक धक्का आहे, ज्यातून सावरणे सध्या तरी त्यांना अवघड दिसते. यातील आणखी एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे स्वीडनमध्ये हिंदु नववर्ष साजरे केले जात नाही, रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या शोभायात्राही काढल्या जात नाहीत. तेथे रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद अथवा बजरंग दल अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनाही कार्यरत नाहीत. तरीही तेथे निर्वासित धर्मांध हिंसाचार घडवतात. युरोपीय राष्ट्रांना अशा दंगली तुलनेने नवीन आहेत; मात्र भारत, भारतीय आणि हिंदू यांच्यासाठी अशा दंगली नव्या नाहीत.

२. देशाची राजधानी सलग ३ वर्षांपासून हिंसाचारामध्ये होरपळणे

काही दिवसांपूर्वी हिंदु नववर्ष, रामनवमी आणि हनुमान जयंती यांनिमित्त आयोजित शोभायात्रांवर हिंसक आक्रमणे करण्यात आली. त्यांपैकी देशाची राजधानी देहलीतील जहांगीरपुरी भागात १६ एप्रिल २०२२ या दिवशी स्थानिक हिंदु समाजाने हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले होते. त्या शोभायात्रेवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाचे रूपांतर दंगलीमध्ये झाले. यामध्ये हिंदूंसह पोलीस कर्मचारीही घायाळ झाले. देहलीमध्ये साधारणपणे वर्ष २०२० पासून प्रतिवर्षी दंगली घडवण्याचा एक ‘पॅटर्न’ (साचेबद्धपणा) सज्ज झाला आहे. वर्ष २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेले शाहीनबागचे आंदोलन आणि त्यानंतर वर्ष २०२० मध्ये झालेली दंगल, नंतर पुन्हा त्याच वर्षी कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधातील कथित शेतकर्‍यांचे आंदोलन अन् २६ जानेवारी २०२१ या दिवशी लाल किल्ला येथे झालेली दंगल आणि आता वर्ष २०२२ मध्ये जहांगीरपुरीमध्ये झालेली दंगल आदींमुळे सलग ३ वर्षांपासून देशाची राजधानी प्रत्येक वर्षी हिंसाचारामध्ये होरपळतांना दिसते. त्यांपैकी वर्ष २०२० आणि २०२२ मध्ये घडवण्यात आलेल्या दंगलींमध्ये अनेक साम्यस्थळे आढळतात. त्यामुळे या हिंसाचाराच्या दोन्ही घटना भविष्यात घडवण्यात येणार्‍या मोठ्या घटनेचा ‘अलार्म’ तर नव्हे ? असा प्रश्न निर्माण होतो.

३. वर्ष २०२० ची देहलीमधील दंगल

३ अ. धर्मांधांनी दंगलीची पूर्वसिद्धता करणे, पोलिसांना त्याची कल्पना नसणे आणि धर्मांधांनी गृहयुद्धाची परिस्थिती घडवून आणणे

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देहलीतील शाहीनबाग परिसरामध्ये अल्पसंख्यांकांचे आंदोलन करण्यात आले. ‘या कायद्याद्वारे देशातील मुसलमानांचे नागरिकत्व रहित करण्यात येईल’, अशी अफवा पसरवण्यात आली. त्याद्वारे देशभरातील धर्मांधांना प्रक्षुब्ध करत हिंसेसाठी प्रवृत्त करण्यात आले. त्या वेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा होता. ट्रम्प हे ज्या दिवशी भारतात आले, त्याच दिवसापासून पुढे ४ दिवस देहलीमधील पूर्व भागात दंगल भडकावण्यात आली. त्यामध्ये मुसलमानबहुल भागातील हिंदु समाजाला लक्ष्य करण्यात आले होते. विशेष म्हणजे एकीकडे दंगल चालू असतांनाही पूर्व देहलीतील शाहीनबाग परिसरात आंदोलन चालूच होते. या दंगलीमध्ये धर्मांधांच्या घरांमध्ये किंवा घरांच्या छतांवर ‘सोडावॉटर’च्या बाटल्या, दगड, तलवारी आदींचा साठा करण्यात आला होता. छतांवर लावलेल्या मोठ्या गलोलद्वारे दगड, सोडावॉटर आणि ॲसिडच्या बाटल्या यांचा मारा करण्यात आला. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता.

या दंगलीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे पोलीस प्रारंभीचा काही वेळ पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून आले होते; कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवण्यात येईल, याची पोलीस यंत्रणेलाही कल्पना नव्हती. त्यामुळे पोलीसही दंगलखोरांचे बळी ठरले होते. दंगलीमधील आरोपींचे सत्ताधारी आम आदमी पक्षाशी (आपशी) संबंध होते. ताहिर हुसेन या आरोपीचे समर्थनही ‘आप’ने केले होते. या दंगलीमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आणि हिंदूंच्या रहिवासी भागाची व्यवस्थितपणे ‘रेकी’ करून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. या दंगलीद्वारे ‘देशहिताचे कायदे लागू करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गृहयुद्धाची परिस्थिती घडवून ते हाणून पाडू’, हा स्पष्ट संदेश देण्यात आला होता.

४. वर्ष २०२२ ची देहलीमधील दंगल

४ अ. बजरंग दलाकडून घेण्यात येणारी हनुमान चालिसा बंद करण्यासाठी धर्मांधाने धमकी देणे आणि धर्मांधांनी दंगलीची सिद्धता ३ मासांपूर्वीच केलेली असणे

उत्तर-पश्चिम देहलीतील जहांगीरपुरी हा परिसर तसा मुसलमानबहुल म्हणून ओळखला जातो. या भागात हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले गेले. त्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांची रितसर अनुमती घेतली होती अन् शोभायात्रेस पोलिसांचे संरक्षणही होते. शोभायात्रा परिसरातील मशिदीच्या समोरून जात असतांनाच एकाएकी दगडफेकीस प्रारंभ झाला.

अर्थात्च वर्ष २०२० च्या दंगलीप्रमाणेच ही दंगलही नियोजनबद्ध होती. सध्या ‘रासुका’ (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत पूर्वी अटकेत असलेला आरोपी अंसार याने ३ मासांपूर्वी ‘बजरंग दलाच्या वतीने आयोजित हनुमान चालिसापठण सप्ताह बंद करावा’, यासाठी धमकी दिली होती. १६ एप्रिल २०२२ या दिवशी झालेल्या दंगलीची चिथावणीही त्यानेच दिली होती. ही शोभायात्रा ‘सी ब्लॉक’ मशिदीसमोरून जात असतांना अचानक आसपासच्या इमारतींमधून दगडफेक आणि सोडावॉटरच्या बाटल्यांचा मारा चालू झाला. या वेळी अंसार आक्रमणकर्त्या जमावास ‘इन्हे छोडना मत, इन्होने जो किया है, उसका अंजाम भुगतना पडेगा’ (यांना सोडू नका, यांनी जे केले आहे, त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल), अशी चिथावणी देत होता. त्यानंतर जमाव हिंसक झाला आणि शोभायात्रेस चहूबाजूंनी घेरून दंग्यास प्रारंभ झाला. यामध्ये तलवारी, लोखंडी सळ्यांसह गोळीबारही करण्यात आला होता. दंगलीत घायाळ झालेले रामशरण सिंह यांनी सांगितले की, या दंगलीची सिद्धता काही मासांपूर्वीपासूनच करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक ते साहित्यही आसपासच्या घरांमध्येच जमा करून ठेवण्यात आले होते.

५. वर्ष २०२० आणि वर्ष २०२२ च्या दंगलींत बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असणे

जहांगीरपुरीमध्ये झालेल्या दंगलीचे प्रमुख ठिकाण होते ते ‘सी ब्लॉक’, कुशल चौक. याच ‘सी ब्लॉक’चा संबंध वर्ष २०२० च्या हिंसाचारामध्येही होता, हे त्या प्रकरणाच्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘सीएए’च्या) विरोधात शाहीनबागमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ‘सी ब्लॉक’, कुशल चौकातूनच भारतात अवैधपणे रहाणार्‍या जवळपास ३०० बांगलादेशी महिला, मुले आणि पुरुष यांना नेण्यात आले होते. त्यानंतर शाहीनबागेप्रमाणेच जहांगीरपुरीमध्येही ‘सीएए’विरोधी आंदोलन करण्यात आले होते आणि त्यामध्ये महिलांसह लहान मुलांचाही वापर करण्यात आला होता. या वेळीही त्याच भागातून आक्रमणास प्रारंभ झाला होता.

६. ‘भारतामध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतो’, हे दर्शवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समज निर्माण करणे

आणखी एक योगायोग, म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा याच काळात होता. ते भारतात येण्यापूर्वी युरोपीय माध्यमांनी अचानक भारतातील जातीय तणावाच्या सूत्रावर वादंग उठवण्याचा प्रयत्न केला होता. अशीच चर्चा वर्ष २०२० मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्‍याच्या वेळीही घडवण्यात आली होती. विदेशी देशांचे प्रमुख भारत दौर्‍यावर येत असतांनाच अशा घटना घडवण्यामागचा एक हेतू स्वच्छ आहे आणि तो म्हणजे भारतामध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतो. त्या अत्याचाराला कंटाळून अल्पसंख्य समाज प्रतिकार करतो. त्यामुळे ‘जो काही हिंसाचार घडतो, त्यास देशातील हिंदु समाजच उत्तरदायी आहे’, असा समज आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करणे आणि त्यानंतर मानवाधिकारांच्या नावाखाली भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

७. मोठ्या संघर्षाची नांदी नाही ना ?

देशात होणारे अशा प्रकारचे संघर्ष हे भविष्यातील (वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी) मोठ्या संघर्षाची रंगीत तालीम आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो; कारण केंद्र सरकारचा निवडणुकीद्वारे पराभव करणे शक्य नसल्याचे विरोधकांच्या आणि त्यांच्या ‘इकोसिस्टीम’च्या लक्षात आले आहे. त्यासाठी प्रथम मतदान यंत्रांच्या हॅकिंगचा मुद्दा पुढे आणून निवडणूक प्रक्रियेविषयी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या सूत्राला जनतेने सपशेल नाकारले.

त्यामुळे देशात विविध वाद निर्माण करायचे आणि त्याद्वारे सातत्याने लहान-मोठे संघर्ष चालू ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर लाल किल्ल्यावर आक्रमण करून दंगल घडवणारे कथित शेतकरी, कर्नाटकमध्ये निर्माण करण्यात आलेला ‘हिजाब’चा वाद देशभरात हळूहळू पसरवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये शोभायात्रांवर झालेल्या दंगली यांद्वारे देशात सर्वच क्षेत्रांमध्ये अशांतता अन् संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का ? याचा विचार होणे आवश्यक आहे.

– पार्थ कपोले

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)